बाजारपेठ पोलीस ठाण्यात पत्रकारांच्या हस्ते गणेशाची महाआरती

भुसावळ प्रतिनिधी :
भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातील पत्रकार बांधवांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. पोलीस ठाण्यात प्रथमच पत्रकारांच्या हस्ते महाआरती आयोजित करण्यात आल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.
यावेळी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, तालुका पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर, पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
महाआरतीसाठी भुसावळ शहरातील विविध वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी, न्यूज पोर्टलचे प्रतिनिधी तसेच यूट्यूब न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पत्रकार बांधवांनी एकत्रितपणे श्री गणेशाची आरती करून गणरायाचे दर्शन घेतले.
गणेशोत्सवाच्या काळात पोलीस आणि पत्रकार यांच्यातील समन्वय, सामाजिक बांधिलकी तसेच परस्पर सुसंवाद अधिक दृढ व्हावा, या दृष्टीने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. पोलीस ठाण्यात पत्रकारांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन केल्याबद्दल पत्रकार बांधवांनी पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी गणरायाच्या जयघोषाने पोलीस ठाण्याचा परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.