भुसावळ (प्रतिनिधी) : हतनूर प्रमुख प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून, धरणातील पाणीसाठा ८८.५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणाच्या १६ रेडियल गेटमधून प्रत्येकी १ मीटर उघडून एकूण १,१४१ क्युसेक म्हणजेच ४० हजार २९४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हतनूर धरणाची पाणीपातळी २१३.२३० मीटर इतकी नोंदविण्यात आली. धरणाची पूर्ण जलाशय पातळी (FRL) २१४.००० मीटर आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता ३४३.५० दशलक्ष घनमीटर असून त्यापैकी ८८.५३ टक्के साठा झाला आहे. तर उपयुक्त (Live) पाणीसाठा २१०.५० दशलक्ष घनमीटर, म्हणजे ८२.५५ टक्के आहे. धरणातून सध्या रेडियल गेटद्वारे १,१४१ घनमीटर प्रतिसेकंद (Cumecs) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कालव्याद्वारे ५.६६ क्युसेक (२०० क्युसेक) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आर.एस. गेटमधून सध्या पाण्याचा विसर्ग शून्य आहे. पाणलोट क्षेत्रात २४ तासांत २०९.२ मि.मी. पाऊस हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील विविध पर्जन्यमापन केंद्रांवर मागील २४ तासांत एकूण २०९.२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, त्याची सरासरी २३.२ मि.मी. आहे. यामध्ये बऱ्हाणपूर येथे ४७.२ मि.मी., देढतलाई ६०.२, टेक्सा ३३.८, एरडी ५४.२, चिखलदरा ६.०, लखपुरी २.६ आणि लोहारा ५.२ मि.मी. पाऊस झाला. तर गोपालखेडा आणि अकोला येथे पावसाची नोंद झाली नाही. हतनूर धरण परिसरात आज १० मि.मी. पाऊस नोंदविण्यात आला असून, आतापर्यंतचा एकूण पाऊस ४५७ मि.मी. इतका झाला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर प्रशासनाचे लक्ष असून, पाणीसाठ्याच्या स्थितीनुसार विसर्गाचे नियमन करण्यात येत आहे.


