भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारी घडामोड समोर आली आहे. प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह मुंबई येथील नंदवन येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या नेतृत्वाखाली भुसावळमधील अनेक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवावर्ग मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्रीताई भंगाळे तसेच निखिल संतोषभाऊ चौधरी यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या राजकीय प्रवेशामुळे आगामी काळातील भुसावळच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर अत्यंत व्यस्त असतानाही वेळ काढून या प्रवेशावेळी स्वतः उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी अनिल चौधरी यांच्यासह उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधत पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. शिंदे यांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेली आपुलकी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे अनिलभाऊ चौधरी यांनी सांगितले. या नव्या राजकीय वाटचालीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील, पाचोरा आमदार किशोरअप्पा पाटील, आमदार बच्चूभाऊ कडू, चोपडा आमदार चंद्रकांतअण्णा सोनवणे, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांतभाऊ पाटील आणि पारोळा आमदार अमोल चिमणआबा पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे चौधरी यांनी नमूद केले. “आजवर ज्या पद्धतीने जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी नाते जपले, त्याच विश्वासाने आणि ताकदीने यापुढेही जनसेवेच्या मार्गावर काम करत राहणार आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून शिवसेनेच्या विचारांसोबत नवी वाटचाल सुरू केली आहे,” असा विश्वास अनिल चौधरी यांनी व्यक्त केला. दरम्यान, धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगराध्यक्षा गायत्रीताई भंगाळे यांच्याबाबत पुढील काळात काय राजकीय निर्णय होतो, तसेच त्यांच्या प्रवेशामुळे त्यांना कोणता दिलासा मिळणार का, याकडे आता भुसावळकरांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणातील समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.


