मंगला एक्स्प्रेसमध्ये विद्यार्थिनींना विषबाधा: पॅन्ट्री कारमधील अन्न खाल्ल्यानंतर विद्यार्थिनींना पोटदुखी, जुलाब; भुसावळ स्थानकावर विशेष वैद्यकीय तपासणी ;

भुसावळ, दि. २८ (प्रतिनिधी) — हजरत निजामुद्दीन–एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसने (१२६१८ अप) शैक्षणिक सहलीसाठी प्रवास करणाऱ्या होली फॅमिली स्कूलच्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे २५ ते ३० विद्यार्थिनींना प्रवासादरम्यान पोटदुखी, जुलाब, मळमळ व उलट्यांचा त्रास झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २८) रात्री घडली. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच भुसावळ रेल्वे प्रशासनाने तातडीने वैद्यकीय यंत्रणा सक्रिय करून स्थानकावर विशेष व्यवस्था केली. प्राथमिक उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
होली फॅमिली स्कूलचे विद्यार्थी हजरत निजामुद्दीन येथून त्रिशूर (त्रिचूर) येथे शैक्षणिक सहलीसाठी निघाले होते. या गटात सुमारे ९१ ते ९३ विद्यार्थी आणि १२ शिक्षक सहभागी असल्याची माहिती आहे. प्रवासादरम्यान एस/३ डब्यातील काही विद्यार्थिनींना अचानक पोटदुखी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही विद्यार्थ्यांना मळमळ व उलट्याही झाल्याचे समोर आले.
प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ४५ विद्यार्थ्यांनी पॅन्ट्री कारमधील अन्नपदार्थ खाल्ले होते. त्यापैकी २५ ते ३० विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचे आढळून आले. मात्र, विद्यार्थ्यांना नेमका कोणत्या कारणामुळे हा त्रास झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून अन्नामुळे विषबाधा झाली असण्याची शक्यता तपासली जात आहे.
भुसावळ स्थानकावर तातडीने वैद्यकीय यंत्रणा तैनात 
मंगला एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर पोहोचताच आरपीएफ, सीआयबी, जीआरपी, स्टेशन मॅनेजर, रेल्वे वैद्यकीय विभाग, आरोग्य विभाग आणि वाणिज्य विभागाच्या पथकाने एस/२ व एस/३ डब्यांची पाहणी केली. वैद्यकीय पथकाने सुमारे ४० ते ४५ विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्रास झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक औषधे तसेच ओआरएस देण्यात आले.
आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन स्थानकावर डॉक्टर, नर्स व रेल्वे कर्मचाऱ्यांसह ॲम्बुलन्सचीही व्यवस्था करण्यात आली होती. वैद्यकीय तपासणी व उपचार पूर्ण करण्यासाठी गाडीला सुमारे पाऊण तास थांबविण्यात आल्याची माहिती आहे.
पॅन्ट्री कारची संयुक्त तपासणी; साहित्य जप्त
विद्यार्थ्यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर आरपीएफ भुसावळ आणि रेल्वे वाणिज्य विभागाने पॅन्ट्री कारची संयुक्त तपासणी केली. तपासणीदरम्यान अमान्य पाण्याच्या बाटल्या तसेच काही खाद्यपदार्थ आढळून आल्याची माहिती आहे. पुढील तपासणी व आवश्यक कारवाईसाठी संबंधित साहित्य वाणिज्य विभागाने जप्त केले.


विद्यार्थ्यांना पुढील प्रवासासाठी वैद्यकीय देखरेख
विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी भुसावळ स्थानकावर उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, होली फॅमिली स्कूलच्या मुख्याध्यापिका मिस मिनी जॉन यांनी विद्यार्थ्यांना ट्रेनमधून उतरविण्यास नकार देत त्यांच्यासोबत पुढील प्रवास सुरू ठेवण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर विद्यार्थ्यांसह मंगला एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
विद्यार्थ्यांची प्रकृती प्रवासादरम्यान सतत वैद्यकीय देखरेखीखाली राहावी, यासाठी डॉ. तालिबा (सीएमपी), डॉ. मोनिका (एडीएमओ), डॉ. रेशमी (एडीएमओ), चेतन फडणीस तसेच आयआरसीटीसीचे कर्मचारी केशव कुमार यांना विद्यार्थ्यांसोबत भुसावळहून मनमाडपर्यंत पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी यापूर्वी भोपाल रेल्वे स्थानकावर जेवण केल्याची आणि त्यानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे त्रासाचे नेमके कारण पॅन्ट्रीतील अन्न, पूर्वी घेतलेले भोजन किंवा अन्य काही कारण आहे का, याबाबत अद्याप निश्चित निष्कर्ष निघालेला नाही.
रेल्वे प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत असून, पुढील प्रवासातही आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.