‘उजेड पेरणारी माणसं’ : प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षाचा आणि माणुसकीचा जिवंत दस्तऐवज

भुसावळ (प्रतिनिधी) : समाजात कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता आणि स्वतःसाठी कमी तर समाजासाठी अधिक जगत अनेक माणसं आपल्या कार्यातून इतरांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण करीत असतात. अशा संघर्षशील, संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वांच्या कार्याला शब्दरूप देणारे पत्रकार व लेखक श्री. आनंदा पाटील लिखित ‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तक केवळ व्यक्तिचित्रांचे संकलन नसून माणुसकीचा प्रेरणादायी आणि जिवंत दस्तऐवज असल्याचे प्रतिपादन डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांनी केले.

बालभारती सदस्य, पुणे येथील डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांनी या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपण अनेकदा मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या यशोगाथा वाचतो; मात्र आपल्या आजूबाजूला अशीही असंख्य माणसं असतात जी शांतपणे समाजासाठी कार्य करीत असतात. संघर्ष, अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दुसऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या या व्यक्तींच्या कार्याची अनेकदा फारशी दखल घेतली जात नाही. अशाच व्यक्तींचा शोध घेऊन, त्यांच्याशी संवाद साधून आणि त्यांच्या जीवनसंघर्षाचा व कार्याचा वेध घेत आनंदा पाटील यांनी हे पुस्तक वाचकांसमोर आणले आहे.

या पुस्तकात तब्बल ८४ व्यक्तींची व्यक्तिचित्रे असून कला, साहित्य, संस्कृती, समाजसेवा आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा त्यात समावेश आहे. या व्यक्ती केवळ शब्दांमधून वाचकांसमोर उभ्या राहत नाहीत, तर त्यांचा संघर्ष, वेदना, जिद्द आणि कार्यातून मिळणारी प्रेरणा वाचकाच्या मनाला स्पर्शून जाते, असे डॉ. पाटील यांनी नमूद केले.

आनंदा पाटील यांच्या लेखनशैलीचे विशेष कौतुक करताना डॉ. पाटील म्हणाले की, पत्रकार म्हणून तब्बल २५ वर्षांच्या प्रवासात त्यांनी समाजातील असंख्य व्यक्ती जवळून पाहिल्या आहेत. माणसं समजून घेण्याची त्यांची संवेदनशीलता आणि बारकाईने निरीक्षण करण्याची क्षमता ही त्यांच्या लेखनाची मोठी ताकद आहे. समाजातील अंधारातही आशेचा दिवा घेऊन उभ्या असलेल्या माणसांचा शोध त्यांनी आपल्या लेखणीतून घेतला आहे.

कोरोनाच्या भयानक संकटाच्या काळातही आनंदा पाटील यांनी माणुसकीचा शोध घेतला आणि त्याच काळात त्यांच्या या लेखनप्रवासाला सुरुवात झाली. पुढे ‘दिव्य मराठी’ वृत्तपत्रातील लेखमालेतून ही व्यक्तिचित्रे वाचकांसमोर आली आणि त्याच लेखनप्रवासातून ‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तक आकाराला आले. त्यामुळे हे पुस्तक केवळ लेखांचे संकलन नसून समाजातील माणुसकी, संघर्ष आणि प्रेरणेची नोंद करणारा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुस्तकाची भाषा हीदेखील त्याची एक मोठी जमेची बाजू असल्याचे सांगताना डॉ. पाटील यांनी म्हटले की, पुस्तकातील लेखन कुठेही बोजड वाटत नाही. भाषा साधी, सोपी, सहज, सुलभ आणि प्रभावी आहे. लेखक एखादी गोष्ट केवळ लिहीत नसून तो वाचकांशी संवाद साधत आहे, एखाद्या व्यक्तीची ओळख करून देत आहे आणि तिच्या जीवनकथेतील संघर्ष व प्रेरणा आपल्यासमोर उलगडत आहे, अशी अनुभूती वाचकाला येते.

“उजेड नेहमी प्रकाशझोतातूनच येतो असे नाही,” असे सांगत डॉ. पाटील यांनी पुस्तकाच्या शीर्षकाची सार्थकता अधोरेखित केली. एखादा शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा उजेड पेरतो, एखादा सामाजिक कार्यकर्ता संकटात सापडलेल्या कुटुंबाला आधार देतो, एखादा कलाकार समाजाच्या वेदनांना शब्द देतो, तर एखादा सामान्य माणूस असामान्य कार्य करून समाजाला नवी दिशा देऊन जातो. अशीच माणसं खऱ्या अर्थाने समाजाला पुढे घेऊन जात असतात.

आजच्या काळात यशाची व्याख्या अनेकदा पैसा, प्रसिद्धी आणि पदाच्या चौकटीत केली जाते; मात्र ‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तक वाचकाला एक वेगळाच आणि अंतर्मुख करणारा प्रश्न विचारते—“तुम्ही आयुष्यात किती उजेड पेरला आहे?” हाच प्रश्न या पुस्तकाचे खरे यश असल्याचे डॉ. जगदीश पाटील यांनी म्हटले आहे.

पत्रकारितेच्या प्रवासात भेटलेल्या माणसांना शब्द देऊन, त्यांच्या कार्याची समाजासमोर नोंद घेऊन आणि त्यांच्या संघर्षातून पुढील पिढीला प्रेरणा मिळेल अशी मौल्यवान साहित्यकृती निर्माण केल्याबद्दल त्यांनी लेखक आनंदा पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

“हे पुस्तक केवळ आनंदा पाटील माझे मित्र आहेत म्हणून वाचावे असे नाही, तर ते खरोखरच अप्रतिम आणि प्रेरणादायी आहे म्हणून प्रत्येकाने वाचावे. आपल्या आजूबाजूला किती मोठी माणुसकी जगत आहे, हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचावे. एखादे व्यक्तिचित्र आपल्याला आपल्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीची आठवण करून देईल, एखाद्याचा संघर्ष स्वतःच्या अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देईल आणि कदाचित पुस्तक वाचून झाल्यावर प्रत्येकजण स्वतःलाच विचारेल—मीही कोणाच्या आयुष्यात थोडासा तरी उजेड पेरला आहे का? किंवा पेरू शकतो का?” अशा भावना डॉ. पाटील यांनी व्यक्त केल्या.

“या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तरी प्रत्येकाने ‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तक वाचायला हवे,” असे आवाहन करत त्यांनी लेखक आनंदा पाटील यांच्या लेखणीला मनापासून सलाम केला आणि पुस्तकातील प्रत्येक उजेड पेरणाऱ्या व्यक्तीला मनःपूर्वक नमन केले.

— डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील
बालभारती सदस्य, पुणे