‘सकाळ’मुळे मला माझ्या बालपणीच्या जीवनाची आठवण झाली — हेमा बेहरा:भागिरथी विद्यालयात जेसीआय ताप्तीचा उपक्रम

 भुसावळ, (प्रतिनिधी)ता. ४ : सकाळने खास मुलांसाठी सुरु केलेला सकाळ एनआयई (Newspaper In Education) पेपर पाहुन मला माझ्या बालपणीच्या शालेय जीवनाची आठवण झाली. असे मत जेसीआय भुसावळ ताप्ती क्लबच्या अध्यक्षा हेमा बेहरा यांनी व्यक्त केले. त्या भागिरथी प्राथमिक विद्यालयात क्लबतर्फे आयोजित शालेय साहित्य व सकाळ एनआयई अंक वाटप कार्यक्रमात बोलत होत्या. 
यावेळी क्लबच्या सचिव रेखा व्यास, कामिनी तिवारी, कामना पाराशर, कंचन रायकवार, सुनीता अग्रवाल, जयश्री अग्रवाल, पूजा चौबे, कांता शर्मा, संगीता शर्मा, सुचित्रा अग्रवाल, कामिनी जैन नंदिनी रायपुरे, निकिता अग्रवाल, मुख्याध्यापक अजय फेगडे, बातमीदार श्रीकांत जोशी मंचावर उपस्थित होते. हेमा बेहरा पुढे म्हणाल्या मी उज्जैन येथे संस्कृत शाळेत शिकत होती तेव्हा दर शनिवारी बालसभा व्हायची. त्यादिवशी शिक्षकांना शिकवण्याचे काम नसायचे मुले गोष्टी, विनोद व सुविचार सांगायची व इतरही उपक्रम राबवायची. ते सर्व उपक्रम मुलांसाठीच्या सकाळ पेपर मध्ये मला दिसले त्यामुळे मला माझ्या बालपणीच्या शालेय जीवनाची आठवण झाली. सकाळचा हा पेपर खुप उपयुक्त आहे. कारण आपण मोबाईल मध्ये जेवढे पाहतो ते लक्षात राहात नाही. स्कोल करत राहतो. पण छापील पेपर मनापासून वाचला तर त्यातील ज्ञान आजीवन आपल्या मेंदुत साठुन राहील. सकाळ एनआयई पेपरचे वाचन हसत खेळत करा कोणताही ताण घेऊ नका. वाचन एन्जॉय करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. निकाता अग्रवाल म्हणाल्या सकाळ एनआयई पेपर वाचनातुन विद्यार्थ्यांना नवीन माहिती तर मिळेलच शिवाय त्यांच्यातील जिज्ञासा जागृत होईल. ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनातील अंधार दुर करता येणे शक्य आहे. यावेळी आर्टिस्ट व्हिजन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जावळे यांनी मनोगत व्यक्त केले व सकाळ एनआयई पेपर मधील उत्कृष्ट चित्र रंगविणाऱ्या विद्यार्थ्यांला पाचशे रुपये रोख बक्षीस देण्याचे जाहीर केले. यावेळी करण शिंदे या तिसरीतील विद्यार्थ्याने लोकमान्य टिळकांच्या जीवनावर भाषण व सकाळ पेपरचे वाचन केल्याने  उपस्थितांनी त्याचे कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांना जेसीआय क्लब तर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ही शाळा क्लबने दत्तक घेतली असुन याआधी सर्व विद्यार्थ्यांना वह्या, गणवेश व बुट यांचे वाटप केले होते. कविता वानखेडे यांनी सुत्रसंचलन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी भावना पाटील, ज्योती हिरे, डिगंबर सपकाळे, रामकृष्ण गरवारे आदींनी परिश्रम घेतले.