भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत सराईत दुचाकीचोराला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीने भुसावळसह जामनेर आणि अमळनेर परिसरातूनही दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ शहरातील झेडटीएस (MOH) पार्किंग शेड येथून विजय जगन्नाथ खडके (रा. मोहित नगर, भुसावळ) यांची सुमारे १५ हजार रुपये किमतीची हिरो मोटोकॉर्प कंपनीची मोटारसायकल (एमएच-१९ ईके-२३५०) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी २७ जानेवारी रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना डीबी पथकातील पोलीस कर्मचारी राहुल बेहेनवाल आणि कुणाल सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाली की संशयित आरोपी चोपडा बसस्थानकाजवळ फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून विशाल राजेंद्र राठोर (वय ४६, रा. भिकनगाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले. न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आरोपीची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने संबंधित गुन्ह्यासह आणखी पाच मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी एकूण सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. तपासात आरोपीने भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच, तसेच जामनेर आणि अमळनेर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतूनही दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास भुसावळ शहर पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक रुचीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलीस कर्मचारी अब्दुल रज्जाक खान, सुबोध मोरे, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे आणि दीपक पाटील यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


