भुसावळात श्रीराम कथेचा भक्तिमय प्रारंभ; भव्य कलश यात्रेत शेकडो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

भुसावळ,(प्रतिनिधी ) दि. ७ : शहरातील लक्ष्मी व्यंकटेश बालाजी मंदिरात सोमवारपासून सात दिवसीय प्रभू श्रीराम कथेला भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. दि. ७ ते १३ जुलैदरम्यान दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत ही कथा होणार असून, भाविकांना आध्यात्मिक लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कथेच्या पहिल्या दिवशी सकाळी १० वाजता प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्या हस्ते व्यंकटेश बालाजी मंदिरात जयपूर (राजस्थान) येथील पूज्य श्री मदन मोहनजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत श्रीराम कथा ग्रंथाचे (पोथी) विधिवत पूजन, आरती व पूजा-अर्चा करण्यात आली.

यानंतर लक्ष्मी चौकातील पुरातन श्रीराम मंदिरापासून भव्य कलश यात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता आणि भक्त हनुमान यांचा आकर्षक सजीव देखावा सादर करण्यात आला होता. हा देखावा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला.

डीजेच्या कर्कश आवाजाला फाटा देत संगीतमय भक्तिगीतांच्या सुरावटींवर शेकडो भाविकांनी भर पावसातही उत्साहाने कलश यात्रेत सहभाग घेतला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या मंगलमय यात्रेत ५१ सुवासिनी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश धारण करून सहभाग नोंदविला. मुसळधार पावसातही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या धार्मिक सोहळ्याप्रसंगी मुख्य यजमान रजनी सावकारे, राधेश्याम लाहोटी, संजय अग्रवाल, मयुर नागोरी, गोटू लाहोटी, गोविंद हेडा, राजेश लढ्ढा, दीपक काबरा, राजीव चांडक, सोना काबरा, मीना अग्रवाल, विना लाहोटी, अयोध्यादेवी मंत्री, प्रिया अग्रवाल, निर्मला चौधरी यांच्यासह शहरातील शेकडो आबालवृद्ध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सात दिवस चालणाऱ्या या श्रीराम कथेचा लाभ अधिकाधिक भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
   
फोटो कॅप्शन - भुसावळ येथे श्रीराम कथा निमित्त मंगळवारी सकाळी कलश यात्रा काढण्यात आली त्यावेळी कलश यात्रेत उपस्थित राधेश्याम लाहोटी,संजय अग्रवाल,मयुर नागोरी,गोटू लाहोटी,गोविंद हेडा,राजेश लढ्ढा,दीपक काबरा,राजीव चांडक, सोना काबरा,मीना अग्रवाल,विना लाहोटी व इतर