भुसावळ, प्रतिनिधी : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून रिपब्लिकन सेनेने भुसावळ नगरपरिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ नगरपरिषद कार्यालयासमोर मडके फोड आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेळगाव बॅरेज व हतनूर धरणामध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध असतानाही नगरपरिषद प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेमुळे भुसावळकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच, 'बी. एन. अग्रवाल' कंपनीकडून भुसावळकरांच्या हक्काच्या पाण्याचा वापर होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेने नगरपरिषद प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये शहराच्या पाणीपुरवठ्याचे रोस्टर २४ तासांच्या आत जाहीर करणे, संबंधित कंपनीविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणे आणि नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविणे या मागण्यांचा समावेश आहे. संघटनेने प्रशासनाला थेट इशारा देत, मागण्यांची तात्काळ पूर्तता न झाल्यास नगरपरिषद परिसरात मडके फोड आंदोलन करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच, भुसावळ शहरातील माता-भगिनी व संतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे शहरातील पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नगरपरिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



