भुसावळात भाजपची पत्रकार परिषद; विरोधकांचे आरोप निराधार असल्याचा दावा, पाणीपुरवठा लवकरच नियमित होणार भुसावळ, प्रतिनिधी : भुसावळ शहरातील विविध विकासकामे, पाणीपुरवठा आणि मोकाट कुत्रे पकडण्याच्या निविदांबाबत माजी आमदार संतोष चौधरी यांनी केलेल्या आरोपांना भारतीय जनता पक्षाने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत सडेतोड प्रत्युत्तर दिले. मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधकांचे सर्व आरोप पूर्णपणे खोटे, निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला. पाणीटंचाई तांत्रिक कारणांमुळे; दहा दिवसांत स्थिती पूर्ववत होणार शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत स्पष्टीकरण देताना नगरसेवक पिंटू कोठारी म्हणाले की, दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांकडून पाणी कपातीचे आदेश दिले जातात. यावर्षी पावसाला झालेला विलंब आणि काही तांत्रिक कारणांमुळे पाण्याच्या आवर्तनावर परिणाम झाला. मात्र, बंधाऱ्यात पाणी उपलब्ध झाल्याने येत्या दहा दिवसांत रोटेशननुसार नियमित पाणीपुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, काही जण केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी बिनबुडाचे आरोप करत आहेत. भुसावळ शहरात प्रशासन नियोजनबद्ध पद्धतीने विकासकामे राबवत असून, प्रत्येक प्रश्नाचे तथ्याधारित उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. मोकाट कुत्रे पकडण्याच्या मोहिमेबाबत बोलताना युवराज लोणारी यांनी सांगितले की, ही मोहीम पूर्णपणे नियमबद्ध असून टप्प्याटप्प्याने राबविली जात आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी केलेले आरोप हे अज्ञानातून करण्यात आले असून, त्यामागे केवळ राजकीय प्रसिद्धीचा हेतू दिसून येतो. दीपनगर आणि वरणगाव परिसरात मोकाट कुत्रे पकडण्यासाठी प्रतिकुत्रा सुमारे ३,५०० रुपयांची निविदा असताना भुसावळ नगरपालिकेने प्रतिकुत्रा १,६५० रुपये दर मंजूर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "जर या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याची शंका असेल, तर माजी आमदार संतोष चौधरी यांनीच हे टेंडर स्वीकारावे. त्यासाठी आम्ही प्रतिकुत्रा १०० रुपये बक्षीसही देण्यास तयार आहोत," असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, नगरपालिकेत सहा कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचा दावा करत, "हे आरोप सिद्ध झाल्यास आम्ही सर्व नगरसेवक सामूहिक राजीनामा देऊ," असे आव्हानही युवराज लोणारी यांनी दिले. अमृत योजनेची कामे वेगाने सुरू अमृत योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामेही वेगाने सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पालिकेची सर्वसाधारण सभा लवकरच पत्रकारांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून, विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही देण्यात आली. मुख्याधिकारी उपस्थित झाल्यानंतर सभेची तारीख जाहीर केली जाईल, असेही लोणारी यांनी स्पष्ट केले. प्रसंगी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे नगरसेविका प्राची पाटील यांनी सुद्धा कथीत आरोपांचे खंडण करीत आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेला प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, नगरसेवक पिंटू कोठारी, संजय नाहाटा, डॉ. प्रसाद बोंडे, किरण कोलते, प्राची पाटील, बोधराज चौधरी, निकी बत्रा, राजू आवटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे भुसावळच्या स्थानिक राजकारणाचे वातावरण अधिकच तापले असून, या घडामोडींवर नागरिकांमध्येही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.



