भुसावळ (प्रतिनिधी )-

जागतिक हिवताप दिनानिमित्त भुसावळ शहरात आरोग्य विभागातर्फे जनजागृती मोहीम राबवण्यात आली. शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ तसेच विविध गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप करून हिवतापाबाबत मार्गदर्शन केले.
या मोहिमेत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी तसेच पालिकेच्या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. हिवताप
हा अॅनाफिलीस डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होणारा आजार आहे. डास चावल्यानंतर साधारण ७ ते ८ दिवसांनी त्याची लक्षणे दिसून येतात. ताप येणे-उतरणे, थंडी वाजणे, डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे तसेच स्नायू व सांध्यांमध्ये वेदना ही प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन रक्त तपासणी करून घ्यावी. हिवतापाचे निदान झाल्यास उपचार मोफत दिले जातात, अशी माहिती नागरिकांना देण्यात आली. हिवताप प्रतिबंधासाठी घर व परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेले पाणी त्वरित हटवणे, दरवाजे खिडक्यांना डासप्रतिबंधक जाळी बसवणे मच्छरदाणीचा वापराचे आवाहन केले.


