भुसावळ (प्रतिनिधी) – येथील नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राला अवैध ठरवण्यात आल्यानंतर त्यांच्या अपात्रतेची शक्यता अधिक गडद झाली आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनीही नगराध्यक्षा गायत्री गौर भंगाळे या लवकरच अपात्र ठरतील, असे संकेत दिले आहेत.

जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना सावकारे यांनी सांगितले की, गौर (भंगाळे )यांच्या कागदपत्रांबाबत आधीपासूनच शंका व्यक्त करण्यात आली होती. जात पडताळणी समितीच्या तपासणीनंतर प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्या आपोआप अपात्र ठरतात. यासंदर्भात अंतिम निर्णय जिल्हाधिकारी लवकरच जाहीर करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावकारे यांनी पुढे दावा केला की, गौर ( भंगाळे) यांच्या कुटुंबातील काही नातेवाईकांचेही जात वैधता प्रमाणपत्र नाकारण्यात आले आहे. राज्यातील आरक्षण नियमांनुसार संबंधित राज्यातच जात प्रमाणपत्र देण्यात येते, असे त्यांनी नमूद केले.
या घडामोडींमुळे भुसावळच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, नगराध्यक्ष पदासाठी लवकरच नव्याने निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाकडून उमेदवारीबाबत विचारले असता, पक्ष नेतृत्व अंतिम निर्णय घेईल, असेही मंत्री सावकारे यांनी सांगितले.
दरम्यान, जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर गायत्री गौर/भंगाळे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे सत्ताधाऱ्यांना धक्का बसला असून, आगामी काळात स्थानिक राजकारणात नवे समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


