भुसावळ येथून ५० शेतकरी ‘पाणी फाउंडेशन फार्मर कप 2026’ निवासी प्रशिक्षणासाठी रवाना

भुसावळ (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील कृषी विभाग व उमेद अभियानाच्या वतीने ५० महिला व पुरुष शेतकरी ‘पाणी फाउंडेशन’ अंतर्गत आयोजित ‘फार्मर कप 2026’ निवासी प्रशिक्षणासाठी दिनांक २३ एप्रिल रोजी रवाना झाले. हे प्रशिक्षण कृषक भवन, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी निघालेल्या बसचे उद्घाटन भुसावळ येथे पार पडले. यावेळी तालुका कृषी अधिकारी ऋषिकेश चौधरी, मंडळ कृषी अधिकारी शुभम मैड, पाणी फाउंडेशनच्या उपविभागीय समन्वयक प्रियंका बैसाणे, सहायक कृषी अधिकारी संगिता पाटील व नितीन प्रजापती, तसेच उमेद तालुका प्रभाग समन्वयक प्रिया वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा दाखवून शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भुसावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना शुभेच्छा देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ‘फार्मर कप’ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
या निवासी प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना जलसंधारण, शेती व्यवस्थापन आणि शाश्वत शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन मिळणार असून, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लागणार आहे.


