भुसावळ (प्रतिनिधी) – वरणगाव येथील २५ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे शहरात पूर्ण काम झालेले नसताना चाळीस टक्के काम अपूर्ण बाकी असताना संबंधित ठेकेदाराला पूर्ण रकमेची देयके नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी दिल्याने तो ठेकेदार आता उर्वरित बाकी असलेले काम ४० टक्के काम पूर्ण करेल का? त्या संबंधित ठेकेदाराला पूर्ण बिले देण्याची कुठल्यास सभेची मंजूरी न घेता परस्पर पूर्ण बिले देण्याचा घाट का घालण्यात आला. या सर्व प्रकाराची समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक आणि शिवसेना पक्षातर्फे जिल्हाधिकारी यांना आज दि. १३ सोमवार रोजी दोन स्वतंत्र निवेदने देऊन करण्यात आली.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वरणगांव नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजना ‘सुवर्ण जयती नगररोथ्यान योजने अतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून शहरात नवीन जलवाहिनी, नवीन पाण्याच्या टाक्या इत्यादी कामे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. परंतु सदर योजनेचे काम साठ टक्के झाले असून उर्वरित चाळीस टक्के काम हे अपूर्ण अवस्थेत असताना देखील पूर्ण काम झालेले नाही आणि संबंधित ठेकेदार अरिहंत कन्स्ट्रक्शन प्रा.ली. या कंपनीला पूर्ण रकमेचा म्हणजे ५ कोटी ६२ लाख १० हजार दोनशे ६२ रुपयांची रक्कम ठेकेदाराला देण्यात आली. ही रक्कम मिळाल्यानंतर शहरात बाकी असलेले उर्वरित कामे हा ठेकेदार करेल का? तो पुन्हा वरणगावला येईल का? असे एक ना अनेक प्रश्न या माध्यमातून निर्माण होत आहे. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांची ३१ मार्च रोजी बदली झाली आणि पदभार सोडल्यानंतर २ एप्रिल रोजी सोनवणे यांच्या स्वाक्षरीने अरिहंत कन्स्ट्रक्शन कंपनीला चेक देण्यात आला. बदली झाल्यानंतर रवींद्र सोनवणे यांच्या स्वाक्षरीने संबंधित ठेके दाराला मोठ्या रकमेचा चेक का देण्यात आला. याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
-नगरसेवकांच्या कुठल्याही बैठकीत मंजुरी न घेता परस्पर दिली रक्कम
२५ कोटी रूपये योजनेच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सध्या अपूर्ण स्थितीत असताना
नगराध्यक्ष सुनील काळे आणि मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे या दोघांनी संगनमताने नगरपरिषदेच्या कोणत्याही विषय समितीची किंवा सर्वसाधारण सभेची पूर्वमंजुरी न घेता, सदर ठेकेदाराला मोठी रक्कम (देयक) परस्पर अदा केली आहे. या सर्व प्रकाराची समिती नेमून चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या सौ.तृप्ता समाधान महाजन, नगरसेवक राजेंद्र चौधरी, विनोद झोपे, नागसेविका शबाना जुमा खाटिक यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते इरफान खाटीक यांच्यासह शिवसेना पक्षातर्फे उप जिल्हाप्रमुख विलास मुळे, भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुका समन्वयक सुरेश चौधरी यांनी जिल्हाहिकारी रोहन घुगे यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.
-शहरातील या ठिकाणी अपूर्ण आहेत पाणी योजनेचे कामे
प्रतिभानगर जलकुंभ बोधणे , विकास कॉलनी जलकुंभ बांधणे ,पवन नगर येथे पाईप लाईन टाकणे, सिध्देश्वरनगर प्रतिभानगर इत्यादी ठिकाणी नळ जोळणी बाकी आहे. तरीही ठेकेदाराला लाभ मिळवून देण्यासाठी घाईघाईने देयक काढले गेले आहे.
-अधिकाराचा गैरवापर करून मनमानी कारभार
ही बाब सार्वजनिक निधीचा गैरवापर आणि अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीचे नुकसान झाले असून शहर विकासाच्या कामात पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे. या परस्पर झालेल्या आर्थिक व्यवहाराची तात्काळ चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
फोटो ओळ – शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देताना नगरसेवक राजेंद्र चौधरी, विनोद झोपे, विलास मुळे, संतोष माळी, सुरेश चौधरी, इरफान खाटीक..


