मुक्ताईनगरात बिबट्याचा थरार; आमदारांसह नागरिकांचे शर्थीचे प्रयत्न; वनविभागावर निष्क्रियतेचे आरोप

मुक्ताईनगर, दि. 12 एप्रिल 2026 – शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात बिबट्या घुसल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन-चार महिन्यांपासून विश्रामगृहाच्या मागील भागात रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन होत असल्याची माहिती नागरिकांनी वारंवार वनविभागाला दिली होती. मात्र, या सूचना दुर्लक्षित केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अखेर रविवारी बिबट्याने थेट शहरात प्रवेश करत विश्रामगृहात दोन तासांहून अधिक काळ थांबून सर्वांना धक्का दिला.

घटनेची माहिती शहरात पसरताच नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. अफवांना उधाण आल्याने अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले, तर बाजारपेठ व बसस्थानक परिसर काही काळ ओस पडला होता. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत नागरिक सतर्क झाले होते.

दरम्यान, वनविभागाचे अधिकारी वेळेवर घटनास्थळी न पोहोचल्याने संतप्त नागरिकांनी स्वतःच पुढाकार घेतला. स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत काही नागरिकांनी लाठ्या-काठ्यांच्या साहाय्याने बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. या ‘पब्लिक मार’मध्ये बिबट्या बेशुद्ध पडल्याची माहिती असून त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या घटनेनंतर शहरातील दहशत काही प्रमाणात कमी झाली असली तरी वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांकडून संबंधित वन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत असून, निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप केला जात आहे.

याशिवाय, काही पत्रकारांचे मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्याचा आरोपही समोर आला असून प्रशासनाच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

ही घटना मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असल्याचे स्पष्ट संकेत देत असून प्रशासनाने तात्काळ प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.