राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण समारंभ मुंबई येथे उत्साहात संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी) – नुकताच मुंबई येथे दिनांक २५ आणि २६ मार्च २०२६ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आयोजित “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” हा पुरस्कार प्रदान समारंभ यशवंतराव चव्हाण सभागृह, जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट (मंत्रालयासमोर) येथे दिनांक २६ मार्च २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमात शासकीय/ निमशासकीय कर्मचारी गटातून पुरस्काराचे मानकरी म्हणून दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय, भुसावळ येथील भौतिक शास्त्र विभागप्रमुख पदावर कार्य केलेले प्रा. डॉ दयाघन सुपडू राणे यांना त्यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय व निःस्वार्थ कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते २०२४-२५ या वर्षासाठीचा “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” समारंभपूर्वक महाराष्ट्र राज्याचे सामाईक न्याय विभागाचे मंत्री मा. ना. संजयजी शिरसाठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दिनांक २५ आणि २६ मार्च २०२६ दरम्यान महाराष्ट्र शासनातर्फे आठवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन मुंबई मध्ये यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राज्यभरातील व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती आणि संस्थांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेत.
. दिनांक २५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता, गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणावरून या कार्यक्रमाची समारंभपूर्वक सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला व्यसनमुक्ती विषयावरच्या साहित्याची दिंडी गेट वे ऑफ इंडिया पासून यशवंतराव चव्हाण सभागृहापर्यंत आणण्यात आली. या दिंडी मधे ढोल पथकासह पुरस्कारार्थी, साहित्य संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मुंबई मधील विविध महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी सहभागी झालेले होते. याच दिवशी व्यसनमुक्ती या विषयावरच्या विविध पैलूंशी संबंधित पाच परिसंवादांचे आयोजन केलेले होते. या मध्ये विविध विषयातील तज्ञ व्यक्तींनी आपली मते व्यक्त केलीत. या साहित्य संमेलनाचा एक भाग म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.
पुरस्कार प्रदान समारंभासाठी प्रमुख मान्यवर म्हणून मा. राहुलजी नार्वेकर, मा. अध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र राज्य, माजी राज्यमंत्री, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, मा. ना. रामदासजी आठवले, मा. ना. संजयजी शिरसाट, मंत्री, सामाजिक न्याय व पालकमंत्री, संभाजीनगर, माधुरी मिसाळ राज्यमंत्री, सामाजिक न्याय, नगर विकास, परिवहन, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास, अरविंद सावंत (लोकसभा सदस्य), मा .रितू तावडे (महापौर, मुंबई), डॉ. हर्षदीप कांबळे (भा.प्र.से., प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) तसेच मा. दीपा मुधोळ मुंडे (भा.प्र.से., आयुक्त, समाज कल्याण, पुणे) यांची उपस्थिती लाभली.
पुरस्कार प्रदान समारंभात सन 2020-21, 2021-22, 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या सलग पाच वर्षांतील व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पुरस्कारार्थींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र सन्मानवस्त्र म्हणून शाल आणि धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते,
या कार्यक्रमात शासकीय/ निमशासकीय कर्मचारी गटातून पुरस्काराचे मानकरी म्हणून दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय, भुसावळ येथील भौतिक शास्त्र विभागप्रमुख पदावर कार्य केलेले प्रा. डॉ दयाघन सुपडू राणे यांना त्यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय व निःस्वार्थ कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते २०२४-२५ या वर्षासाठीचा “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” समारंभपूर्वक महाराष्ट्र राज्याचे सामाईक न्याय विभागाचे मंत्री मा. ना. संजयजी शिरसाठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रा. डॉ. दयाघन राणे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून सामाजिक कार्याशी जुळलेले असून व्यसनमुक्तीसह विविध ज्वलंत सामाजिक विषयांवर ते सामाजिक जागृती करीत आहेत. महाविद्यालयीनस्तर पासून ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जळगाव जिल्हा समन्वयक, विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य आणि महाराष्ट्र शासनाच्या नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेसाठी नाशिक विभागीय संघटक प्रमुख म्हणूनही ते व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात निरंतर कार्यरत आहेत. विविध शाळा, महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ, रोटरी क्लब अशा संस्थांच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन तर पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती करीत आहेत. तसेच ज्या ज्या भागात व्यसनांचे प्रमाण जास्त आहे आहे तेथे त्यांनी होळी, दिवाळी, गुढीपाडवा, आषाढी एकादशी सारख्या सणांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे कार्य केलेले आहे. आकाशवाणी जळगाव वरून चार भाषणे आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेचे मुखपत्र असणारे मासिक कल्याण यात्रा सह विविध नियतकालिकांमधून आतपर्यंत २६ लेख आणि प्रेरक कथांच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती विषयाच्या निरनिराळ्या पैलूंबद्दल सामाजिक जागृती केलेली आहे. त्यांच्या या अखंड आणि अविरत कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव केला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. डॉ. दयाघन राणे यांचे प्राचार्य डॉ. आर. पी. फालक, भुसावळ शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. रमण भोळे, माजी प्राचार्य आणि खान्देशातील नॅनोशास्त्रज्ञ डॉ. एल. ए. पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. पी. बी. चौधरी अहिल्यानगर जिल्ह्यातील पेमराज सारडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. डी. एम. पाटील यांचेसह जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रातील असंख्य प्रतिष्ठित नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
प्रा. डॉ. दयाघन राणे यांच्या या सन्मानामुळे जळगाव जिल्ह्याचा गौरव वाढला असून, समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे “व्यसनमुक्त महाराष्ट्र” घडवण्याच्या दिशेने हे एक प्रेरणादायी पाऊल असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
फोटो ओळ – राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान समारंभात प्रतिनिधिक मनोगत व्यक्त करीत असताना प्रा. डॉ. दयाघन राणे



