भुसावळ (प्रतिनिधी) व, दि. 31 मार्च 2026 — राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण संचालनालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, आता शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांची पटपडताळणी निश्चित तारखांना करण्यात येणार आहे.

परिपत्रकानुसार, इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र पटपडताळणी करण्यात येणार नाही. या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेतील उपस्थितीच अधिकृत संख्या म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी मराठी, इंग्रजी आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या परीक्षांच्या दिवशीच केली जाणार आहे. तसेच, इयत्ता 2री ते 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी पॅट परीक्षांच्या दिवशी — 11 एप्रिल 2026, 15 एप्रिल 2026 आणि 22 एप्रिल 2026 — या तारखांना करण्यात येणार आहे.
याच तारखांना इयत्ता 11वीच्या मराठी, इंग्रजी व भौतिकशास्त्र विषयांच्या परीक्षाही आयोजित करण्यात येणार असल्याने शाळांना परीक्षा वेळापत्रक आखताना या बाबींचा विचार करणे आवश्यक ठरणार आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी पटपडताळणी करून खोट्या विद्यार्थी संख्येला आळा घालण्याचा हा प्रयत्न असल्याची माहिती ज्येष्ठ शिक्षक नेते प्रा. ह. दलाल यांनी दिली आहे.
या निर्णयामुळे शाळांमध्ये प्रशासनिक शिस्त वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


