रस्त्यात अडवून इसमास लूटले: दीपनगर येथील घटना:

भुसावळ (प्रतिनिधी: तालुक्यातील दिपनगर परिसरात एका व्यक्तीकडून जबरदस्तीने रोख रक्कम लुटल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

याप्रकरणी राजेश श्रीराम साबळे (वय ५२, रा. दिपनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:45 वाजण्याच्या सुमारास दिपनगर येथील इलेक्ट्रिक मेंटेनन्स कार्यालयासमोर ही घटना घडली. संशयित आरोपी सम्राटकुमार सुरेश बनसोडे (रा. फेकरी, ता. भुसावळ) याने फिर्यादीस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या खिशातील १० हजार रुपये (५०० रुपयांच्या २० नोटा) जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4), 352 व 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल महेश चौधरी करीत आहेत.

पोलीसांकडून संशयित आरोपीविरुद्ध कारवाई सुरू असून अधिक तपास सुरू आहे.