भुसावळात 29 मार्च रोजी ‘चैत्रपालवी’ भाषिक कविसंमेलनाचे आयोजन:

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रतिष्ठा महिला मंडळ, भुसावळ यांच्या वतीने शहर व तालुक्यातील काव्यरसिकांसाठी ‘चैत्रपालवी’ या भाषिक कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा काव्यमहोत्सव रविवार, दि. 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ब्राह्मण संघ, भुसावळ येथे पार पडणार आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. संजयभाऊ सावकारे हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सौ. शैलजा नारखेडे, प्रा. डॉ. रश्मी शर्मा, प्रा. किसन वराडे, डॉ. सुषमा खानापूरकर, प्रा. संध्या महाजन आणि सौ. जयश्री काळवीट उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्षा म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनीताई सावकारे कार्यभार सांभाळणार आहेत.

‘चैत्रपालवी’ कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. किसन वराडे (अंबरनाथ) राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुषमा खानापूरकर उपस्थित राहतील.

या कविसंमेलनात विविध मान्यवर कवी-कवयित्री सहभागी होणार असून त्यामध्ये प्रा. संध्या महाजन, ललिता टोके, ज्योती वाघ, घनशाम सावरकर, जयश्री काळवीट, सुनीता येवले, श्रीकांत जोशी, ज्योती राणे, प्रकाश पाटील, लीना अहिरे, हारून उस्मानी, डॉ. मिलिंद धांडे, निलिमा नेहेते, राजेंद्र जावळे, संध्या भोळे आणि सिमा भारंबे यांचा समावेश आहे.

या काव्य संमेलनातून विविध भाषिक कवितांचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार असून, भुसावळच्या सांस्कृतिक क्षेत्रात हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. आयोजकांनी काव्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.