अंगाईचा मंद लय, शांत सूर बाळाच्या मेंदूला विश्रांती घेण्याचेच संकेत देतात : भुसावळात ‘आघाववाडीची गाणी’ कार्यक्रमात हिंगोलीचे कवी गणेश आघाव यांचे मत:

भूसावळ (प्रतिनिधी ) – अंगाईचा मंद लय, शांत सूर बाळाच्या मेंदूला विश्रांती घेण्याचे संकेत देतात. अर्थात, ती बाळाची चिडचिड थांबते, रडणे कमी होते आणि त्याला नैसर्गिकरीत्या शांत झोप लागते. मात्र, माेबाइलच्या युगात आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अंगाई गाणारी आई आणि आजी घरात एकत्र दिसणं दुर्मीळ बनले आहे, असे मत हिंगाेलीचे कवी गणेश आघाव यांनी भुसावळात व्यक्त केले.
सहकार नगरातील विवेक वणीकर यांच्या निवासस्थानी आयाेजित छाेटेखानी ‘आघाववाडीची गाणी’ या काव्यगायन कार्यक्रमात ते बाेलत हाेते. वयाची नव्वदी पार केलेल्या कमल वसंत वणीकर आणि त्यांच्या स्नूषा शाेभा वणीकर यांनी गाेष्टींचं पुस्तक भेट देऊन आघाव यांचे स्वागत केले. कवी आघाव यांनी सर्वप्रथम अंगाई गाणे हे केवळ बाळासाठीच नाही, तर आईसाठीही एक प्रकारचे थेरपी असते. गाण्यामुळे आईच्या मनातील ताण कमी होतो आणि तिलाही प्रसन्न वाटते, ज्याचा सकारात्मक परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. आधी घराेघरी झाेका बांधलेला असायचा. आजी किंवा आई बाळाला जाेजवायची. हल्ली मात्र हे चित्र दुर्मीळ झाले आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांनी ‘इंद्रायणी’ ही कविता सादर केली. वारकरी संप्रदाय, भक्ती आणि विठ्ठल भेटीची ओढ यांचे अत्यंत सुंदर दर्शन घडवणारी ही रचना आहे. ही कविता केवळ नदीचे वर्णन नसून ती मनाच्या निर्मळतेचे आणि भक्तीच्या प्रवासाचे प्रतीक मानली जाते. ‘मळ्यावर माझ्या पाखरांच्या खेपा, काड्यांचा विणती सुगरणी खाेपा’, ‘भुईच्या दाराला मिरुग सांडताे, बैला संगती माेघडा हाकताे’ या शेतीमातीच्या कविताही सादर करून त्यांनी टाळ्या मिळवल्या. ‘माती डिजिटल झालीय’ या शिर्षकाच्या कवितेतून त्यांनी काव्यनिर्मितीची परिभाषा कशी बदलत चालली आहे हे अधाेरेखीत केले.

‘पाेरीला शाळेत निघाल्या’ला दाद
स्त्री-शिक्षणाच्या चळवळीला शब्दांत गुंफणारा एक सुंदर आविष्कार असलेली ‘पाेरीला शाळेला निघाल्या’ ही कविता कवी आघाव यांनी लय-ताल आणि सूरात सादर केली. जपानी भाषेसह ३२ आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये आणि अनेक भारतीय बोलीभाषांत या कवितेचा अनुवाद झाला आहे. महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या मुलींचे शिक्षण आणि डोंगरवाटांचे चित्रण करणारी ही कविता, चक्क जपानच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे. त्यातील ‘पाेरी शाळेत निघाल्या डाेंगर वाटांच्या, पऱ्यांना पुसती तुम्ही गं कुणाच्या?’ या ओळी काळजाला भिडल्या. ही कविता त्यांनी लेवागणबाेली, गुजराती, राजस्थानी भाषेतही म्हटली.

घराेघरी कवितेचा सूर घुमू द्या
कुटुंबात सुसंवाद, प्रसन्न वातावरण कायम ठेवायचे असेल तर कविता, अभंग, बालगाण्यांचा सूर घुमला पाहिजे. अर्थात, त्यासाठी आजी नावाचं विद्यापीठ प्रत्येकानं जपलं पाहिजे. तिच्याकडून गाेष्टी, कथा, चुटकुले, लाेकगाणी श्रवण करण्याची नितांत गरज आहे. ज्या घरात तीन पिढ्या एकत्र नांदताना दिसतात ते घर परमवैभवाला पाेहाेचले आहे असे समजावे. संतांचा सहवास लाभणे हे भाग्याचं लक्षण आहे असा विचारही कवी आघाव यांनी दिला. पेरणीच्या, कणसांच्या, मातीच्या, स्थलांतरितांच्या कविता सादर करताना त्यांनी संत तुकारामांच्या अभंगांसह वारकरी संप्रदाय, भक्ती आणि विठ्ठल भेटीची ओढ यांचे सुंदर दर्शन घडवणाऱ्या रचनाही सादर केल्या.