भुसावळात प्रेमविवाहानंतर तरुणाला विवस्त्र करून मारहाण : ,५ आरोपींना अटक, नवविवाहित तरुण गंभीर जखमी :आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळ (प्रतिनिधी ) : प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून तरुणावर अमानुष अत्याचार करून त्याला विवस्त्र अवस्थेत खांबाला बांधून मारहाण करण्यात आली तसेच त्याच्या पत्नीचे अपहरण केल्याची संतापजनक घटना भुसावळ शहरात घडली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गंभीर घटनेमुळे भुसावळसह जिल्हाभरात मोठी खळबळ उडालेली आहे.
चेतन दिलीप जंगले (वय २५, रा. खडका) याने शिरपूर कन्हाळा गावातील एका मुलीसोबत १८ मार्च २०२६ रोजी नाशिक येथील पंचवटी येथे प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर दोघांनी नातेवाईकांना माहिती दिली. १९ मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिल्यानंतर ते चेतनच्या मामाच्या घरी मुक्कामी होते.
दरम्यान, २० मार्च रोजी दुपारी सुमारे ११.३० ते १२.०० वाजण्याच्या सुमारास मुलीचे नातेवाईक मनोज पाटील, रूपाली उर्फ पूनम पाटील, तेजस पाटील, कोमल पाटील व इतर १० ते १२ जणांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्यांनी मुलीला पकडून मारहाण करत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने पळवून नेले.
यानंतर आरोपींनी चेतन जंगले याला घरातच बेदम मारहाण केली. रुमालाने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर त्याला बाहेर ओढून नेऊन खांबाला बांधून विवस्त्र केले व लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली. “मुलीला सोडून दे” असा जबरदस्ती कबुलीजबाब घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर आरोपींनी त्याला मोटारसायकलवरून खडका येथे आणत घरापर्यंत मारहाण केली. घरी येऊन आई-वडिलांना मारहाण व शिवीगाळ करत घर जाळून टाकण्याची धमकी दिली. परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप करून चेतन याची सुटका केली.
जखमी अवस्थेत चेतन याला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पुढील तपास करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
घटना उघडकीस आल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली व तपासाबाबत सूचना दिल्या.
दरम्यान, कोमल प्रकाश पाटील (२४), विजय नरोत्तम पाटील (५२), हेरंब महेश चौधरी (१९), ज्ञानेश्वर भास्कर भोई (१९) व संजय सोनू बढे (६१) या पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना भुसावळ न्यायालयात हजर केले असता २५ मार्चपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रेमविवाहाच्या कारणावरून घडलेल्या या अमानुष प्रकारामुळे भुसावळ परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.