यावल (प्रतिनिधी ) – शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या इको वाहनाला एस.टी. बसने जोरदार धडक दिल्याने आज सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात चालकासह सुमारे १० ते १२ लहान शालेय विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळी साडेसातच्या सुमारास एमएच ४० एन ९८४५ क्रमांकाची यावल-टाकरखेडा मार्गावरील एस.टी. बस भालशिव पिंप्री फाट्यावरून जात असताना, भालशिव पिंप्रीकडून यावल येथील खासगी शाळेकडे विद्यार्थी घेऊन जाणारी एमएच ३७ जी ६६८० क्रमांकाची इको कार समोर आली. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात इको कारमधील चालक व विद्यार्थी जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमी विद्यार्थ्यांवर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रथमोपचार केले. गंभीर जखमी दोन विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
एस.टी. बसचे चालक ए. ए. तडवी व वाहक एस. एम. पाटील हे होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. विद्यार्थी वाहतूक करणारी इको कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, यावल एस.टी. आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्यात भेट देऊन अपघाताची माहिती घेतली तसेच जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांची सर्रास सुरू असलेली अवैध वाहतूक पुन्हा चर्चेत आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि शैक्षणिक हक्कांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


