भुसावळ (प्रतिनिधी ) : जळगाव जिल्ह्यात भुसावळ पालिकेची निवडणूक बहुचर्चित ठरते आहे. भाजपने राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारेंना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विराेधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने गायत्री चेतन भंगाळे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या प्रचाराची धुरा मंत्री सावकारेंच्या तर राष्ट्रवादीची धुरा माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे, माजी आमदार संताेष चाैधरी व माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चाैधरींच्या खांद्यावर आहे. खडसे आणि चाैधरी हे गेल्या २५ वर्षानंतर प्रथमच एकसंधपणे ही निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीने घराणेशाहीचा मुद्दा आक्रमकपणे मांडून सावकारेंना जेरीस आणले आहे. इतकेच नव्हे तर भुसावळ पालिकेच्या निधीवर कसा डल्ला मारला जाताे आहे हे चव्हाट्यावर आणण्यासाठी राष्ट्रवादीने ‘महाराष्ट्राची भुसावळ फाइल’ नावाची १२ पानांची पुस्तिका वितरीत केली आहे. त्यात कमिशनचे खाेके एका नेत्याच्या घशात कसे जाताहेत हे खुबीने मांडले आहे. त्याला ‘याच कामासाठी तर आपल्या घरचं कुणी तरी नगरपालिके हवं आहे. त्यासाठीच तर सर्वांना फाट्यावर मारून उठाठेव केलीय’ अशा आशयाचे मार्मिक कॅप्शन दिले आहे. हा टाेला कुणाला हाणला आहे हे मुखपृष्ठ पाहिल्यावर लगेच ध्वनीत हाेते आहे. ‘भ्रष्टाचारमुक्त भुसावळ’ अशी टॅगलाइनही दिली आहे.

तावमारे भाऊंच्या नाकर्तेपणाची कहाणी
पुस्तिकेत अमृत याेजनेचे काम सुरू असल्याचे चित्र दाखवले आहे. तेथे एक नेता दाखवला आहे. ताे ‘ठेकेदार मला पाेसतील की याेजना पूर्ण करतील?’ असा प्रश्न विचारलेला आहे. इतकेच नव्हे तर ‘भुसावळच्या नळांना थेंब थेंब पाणी, तावमारे भाऊंच्या नाकर्तेपणाची कहाणी’ असे शिर्षक दिले आहे. अमृत याेजना टप्पा १ पूर्ण नसताना दुसऱ्या टप्प्याची घाई कशाला? आता चार वेळा मुदतवाढ मिळूनही याेजना पूर्ण झाली नाही याची जबाबदारी चार वेळा निवडून आलेले तावमारे भाऊ घेतील का? असा खाेचक प्रश्न विचारला आहे. इतकेच नव्हे तर माध्यमांनी प्रकाशित केलेल्या बातम्यांची कात्रणे त्याला जाेडली आहेत. अर्थात, पालिकेतील गत काळात असलेल्या सत्ताधाऱ्यांची लक्तरेच वेशीवर टांगली आहेत. मंजूर झालेली स्वच्छ सुंदर उद्याने झालीत यांना चरायची माेकाट कुरणे असा मुद्दाही मांडला आहे. शहरातील उद्यानांसाठी मंजूर निधीचा मलिदा कसा लाटला जाताे आहे हे त्यात मांडले आहे. आणि शेवटी ‘यांनी चार वेळा निवडून येण्याचा इतिहास घडवला की भुसावळची दुर्दशा करून भुगाेलच बिघडवला? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
राजकीय बाजार उठवण्याचा दिला नारा
- हाॅकर्स : विक्रेत्यांचा बाजार उठवणाऱ्यांचा आता राजकिय बाजार उठवा अशी साद या पुस्तिकेतून घालण्यात आली आहे. काेणतंही ठाेस काम न करता ज्या भुसावळकरांच्या विश्वासावर सलग चार वेळा निवडून आलेले हे सदा तावमारेभाऊ त्याच भुसावळकरांच्या समस्या साेडवण्याची यांची जबाबदारी नाही का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
- बसस्थानक : भुसावळ शहरातील बसस्थानकात पावसाळ्यात तळे साचते. प्रवाशी घसरून पडतात. वर्षानुवर्ष ही समस्या कायम आहे. तिच्यावर या पुस्तिकेतून प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याला साजेसे आकर्षक चित्र प्रकाशित केले आहे. ‘विकासाचा नाही ठाव नावाला मंत्र्याचं गाव’ असे शिर्षक या फाेटाेला दिले आहे. शहराची विदारकता ते मांडते.
- ठेकेदारी : शहरातील रस्ते, गटारींची कामे निकृष्ट हाेत असल्याची लाेकांची ओरड आहे. हाच धागा घेऊन पुस्तिकेत त्यावर परखड टिका करण्यात आली आहे. ‘यांचे नगरसेवक यांचेच ठेकेदार, यांच्या कारनाम्यांना भुसावळकर बेजार’ अशी टॅगलाइन देण्यात आली आहे. नगरसेवकच ठेकेदार हाेऊन कसे गब्बर झाले आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.



