मुंबई : भाजपा सरकार सत्तेवर येण्यास कारणीभूत ठरलेल्या लाडकी बहिण योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याने खळबळ उडाली आहे. बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला असून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत सरकारी यंत्रणेच्या वापराशिवाय आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हा घोटाळा होणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

योजनेत भाऊरायांची घुसखोरी
सध्या लाडकी बहीण योजनेसाठी काही अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या पण सुरुवातीच्या अनागोंदीमुळे या योजनेत लाडक्या भाऊरायांनी घुसखोरी करत 1500 रुपयांचे अनेक हप्ते गुपचूप पचवले. पण आता ई-केवायसी आणि खात्यांच्या तपासणीत धक्कादायक खुलासे समोर येत आहे. या योजनेत थोडा थोडका नव्हे तर 164 कोटींचा महाघोटाळा झाला आहे. माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यावरून याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महायुती सरकारवर गंभीर आरोप केलेत.
सरकारी यंत्रणेच्या वापराशिवाय आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. योजनांच्या नावाखाली जनतेच्या पैशांवर डल्ला मारणे आणि सरकारी तिजोरी रिकामी करणे ही भाजपा-मिंधे गटाची जुनी खोड असून मुंबई महानगरपालिकेतही तेच सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. या घोटाळ्यामुळे सामान्य जनतेचा पैसा कसा लुटला जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
एका बाजूला सणासुदीच्या काळात जनतेच्या पैशांची अशी लूट सुरू असताना दुसरीकडे राज्यातील शेतकरी मात्र मदतीविना अंधारात असल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असे खोटे आश्वासन सत्ताधार्यांनी दिले, परंतु प्रत्यक्षात शेतकर्यांच्या हाती काहीही पडले नाही, असे ते म्हणाले.
पुरूषांनी घेतला योजनेचा लाभ
या योजनेत 12 हजार 431 पुरुषांनी योजनेत घुसखोरी केली आणि सुमारे 12 महिन्यांचे 1500 रुपयांचे हप्ते गुपचूप पदरात पाडून घेतले. धक्कादायक बाब म्हणजे, या पुरुषांना योजनेचा लाभ मिळत असतानाही त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई नाही. केवळ पुरुषच नव्हे, तर 77 हजार 980 अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या अपात्र महिलांच्या खात्यात सुमारे 13 महिन्यांपर्यंत 1500 रुपये मासिक हप्ता जमा होत होता. 12 हजार 431 पुरुष आणि 77 हजार 980 अपात्र महिलांनी मिळून सरकारी तिजोरीवर 164 कोटी रुपयांचा दरोडा घातला आहे.


