भुसावळ (प्रतिनिधी ) –
एकीकडे दिवाळी जवळ आली आहे तर अजूनही काही ठिकाणी महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळाचे भीषण वास्तव आहे. याचे गांभीर्य ओळखून श्रम साधना ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राचार्य डॉ जी के पटनाईक यांच्या मार्गदर्शनात उस्फुर्तपणे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या व मदतीची गरज असलेल्या पुरग्रस्थांना मदत करण्याचे ठरविले. यावेळी महाविद्यालयातील प्रत्यकाने स्वतःच्या पगारातील निधी संकलित केला व एकत्रितपणे गरजू पुरग्रस्थांसाठी जीवनावश्यक किराणा साहित्याचे किट विकत घेतले. तसेच संस्थेने देखील याकामी मोलाची मदत दिली. त्यानंतर डॉ संदीप पाटील व डॉ दिनेश पुरी यांनी नुकसान झालेल्या विविध ठिकाणी भेटी दिल्या व पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या आदिवासी भिल्ल समाजाच्या बहुसंख्य मजूर असलेल्या गहुले या गावात मदत करण्याचे ठरले.
त्यानुसार डॉ पी जी दामले, डॉ संदीप पाटील, डॉ दिनेश पुरी, डॉ प्रविण शिरुळे, वी एस पवार, वीरेंद्र मोरे, जयदेवसिंग रावळ, महेंद्र पाटील, संतोष पाटील, प्रविण पाटील यांनी प्रत्यक्ष गहुले गावात जाऊन मदत वितरित केली. याप्रसंगी गावातील सर्व ११० परिवारांना किराणा साहित्याचे किट वितरित करण्यात आले. याकामी त्यांना गहुले येथील पोलीस पाटील अनिल तडवी, जिल्हा परिषद शिक्षक महेश सोनवणे, भालचंद्र अमृतकर तसेच डिगंबर तळेकर यांनी अनमोल सहकार्य केले.
यावेळी अनपेक्षित मिळालेल्या या मदतीमुळे सर्वच कुटुंबे हर्षोल्हासित झाले. त्यांनी सांगितलेल्या पुराच्या आठवणींनी उपस्थित सर्वच स्तब्ध झाले.
महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या या मदतीचे संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत यांनी विशेष कौतुक केले.



