प्रासंगिक -जागतिक भूल दिन ; भूल तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया झाल्या सुलभ, अनेकांना मिळते जीवदान – डॉ. गणेश भारुळे

-भारतात दररोज एक लाख पेक्षा जास्त शस्त्रक्रिया होतात. शस्त्रक्रिया कक्ष हे अचूकता, संघभावना आणि अनेकांसाठी गूढतेचे ठिकाण आहे. शस्त्रक्रियेमुळे अनेकांचे प्राण वाचतात.
या प्रक्रियेत पडद्यामागे काम करणारा एक मुक नायक असतो तो म्हणजे भूलतज्ञ. 16 ऑक्टोंबर हा जागतिक भूलदिन असून या दिवशी जगभरामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील भूल या विषयावरती चर्चासत्रे होऊन अधिक प्रगतशील होण्यासाठी प्रयत्न केले जातात.

वैद्यकीय क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे यामुळे अचूक निदान होऊन तात्काळ उपचार होत असतात या निदान नंतरच्या शस्त्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका भूलतज्ञांची असते. जो भुलीचे औषध, वेदना नियंत्रण आणि अतिदक्षता उपचार या विषयांमध्ये पारंगत असतो. कोणतीही शस्त्रक्रिया ही रुग्णाच्या जीवनाशी निगडित असते यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी भुलतज्ञ रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, रक्तदाब, मधुमेह, हृदयाची तपासणी (ईसीजी) आणि इतर तपासण्या यांचा सखोल अभ्यास करतो.

या आधारे सुरक्षित भूल प्रकार निश्चित केला जातो यामध्ये संपूर्ण भूल म्हणजेच पूर्ण शरीर बधिर करणे, प्रादेशिक भूल म्हणजे शरीराच्या विशिष्ट भागाला बधिर करणे, स्थानिक भूल म्हणजे छोट्या भागासाठी बधिरता करणे, शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाच्या हृदयगती, ऑक्सिजनची पातळी आणि इतर महत्त्वाच्या लक्षणांवर लक्ष ठेवले जाते.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला भूलनंतर देखरेख कक्षात ठेवून निरीक्षण केले जाते.

आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे भूल प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि प्रभावी झाली आहे.

दुसरा स्तंभ : पुनर्जीवन पद्धत — जीवन वाचविण्याचे कौशल्य

गेल्या अनेक दशकांपासून जगभरातील डॉक्टर हृदय फुफ्फुस पुनर्जीवित तंत्र या पद्धतीचा प्रसार करत आहेत.हृदय बंद पडल्यास, योग्य वेळी सीपीआर दिल्यास व्यक्तीचे जीवन वाचविता येते.

भारतामध्ये भारतीय भूलतज्ञ संस्था यांनी प्रत्येक नागरिकाला जीवनरक्षक बनविण्यासाठी फक्त दाबावर आधारित जीवन सहाय्य प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली सोपी आहे. कोणताही सामान्य नागरिक ती सहज शिकू शकतो.

सीओएलएसमध्ये तीन महत्त्वाचे टप्पे आहेत जीवन चिन्ह नसल्याची ओळख करून सीपीआर देणे, छातीवर सतत दाब देणे, रुग्णाला लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचविणे या प्रक्रियेमुळे थांबलेले हृदय पुन्हा चालू होण्यास मदत मिळते. म्हणूनच सीओएलएसला जीवन संजीवनी म्हटले जाते.

भारतीय भूल संघटनेकडून जळगाव शहरासह परिसरात अनेक विचारमंथन सत्रे, प्रात्यक्षिके आणि जनजागृती मोहीमा आयोजित केल्या आहेत.शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष सीओएलएस प्रशिक्षण दिले जात आहे.यामुळे प्रत्येक घरात एक जीवन रक्षक तयार होणे हा उद्देश आहे.

भूलतज्ञ फक्त भूल देत नाही तर तो तुमचे जीवन सुरक्षित ठेवतो भूल शास्त्र समजून घेणे आणि पुनर्जीवन पद्धत शिकणे हाच खरा मानवतेचा सन्मान आहे

डॉ. गणेश भारुळे

भूलतज्ञ, जळगाव

९८२२३५६५४१