भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळातील लाच प्रकरणात तहसीलदार यांची सखोल चौकशी करून त्यांना सहआरोपी करून त्यांच्यावर अटकेची व निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केदार सानप यांनी केली असून याबाबत मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी मुख्यमंत्री तसेच एसीबीच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे केली आहे. तसेच तहसीलदारांचे कॉल्स डिटेल्स तपासा यामुळे त्रयस्ताच्या चौकशीतून अनेक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली आहे

वाळू वाहतुकीचे वाहन चालू देण्यासह कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 73 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना भुसावळ तहसील कार्यालयासमोर वराडसीम तलाठी नितीन पंडितराव केले (46), कठोरा कोतवाल जयराज रघुनाथ भालेराव (49), तिघे्र, ता.भुसावळ येथील खाजगी पंटर शिवदास लटकन कोळी (59) यांना जळगाव एसीबीने अटक केली. ही कारवाई सोमवारी दुपारच्या सुमारास जळगाव एसीबीने केली मात्र या लाच प्रकरणामागील मुख्य मास्टरमाईंड भुसावळ तहसीलदार निता लबडे असल्याचा दाट संशय असून त्यांना या प्रकरणात सहआरोपी करून त्यांच्यावर अटकेची व निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केदार सानप यांनी केली आहे.
त्रयस्त इसमाने रेकॉर्डींगमध्ये घेतले तहसीलदारांचे नाव
लाच स्वीकारण्यापूर्वी त्रयस्त इसम शिवदास लटकन कोळी (तिघे्र, ता.भुसावळ) याने तक्रारदाराशी संवाद साधताना तहसीलदार व अन्य महसूलमधील आप्पांसाठी 73 हजारांची लाच स्वीकारल्याचे मान्य केल्याचे संभाषण एसीबीकडे आले आहे. तक्रारदाराने यावेळी तहसीलदारांचे किती पैसे यावर त्रयस्थाने 73 मध्ये सगळे येतात, असा उल्लेख केला असून केले आप्पा, जितू, तायडे आप्पा, जयराज, केले आप्पा यांच्या नावाचा उल्लेख करीत ते मेन असल्याचा उल्लेख केल्याने महसूल प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची साकळी कार्यरत असल्याचे सिद्ध होते. शिवाय याच दिवशी कोळी याने जळगावच्या वाळू वाहतूकदाराकडून 86 हजार रुपये वाळू वाहतुकीचा हप्ता वसुल केला आहे. एखादा खाजगी इसम अधिकार्यांच्या परवानगीशिवाय वा संभाषणाशिवाय ही रक्कम वसुल करूच शकत नाही. या सर्व प्रकरणामागे तहसीलदार या मास्टरमाईंड असल्याने त्यांनाही आरोपी करून त्यांच्यावर कुठल्याही दबावाविना कारवाई करण्याची मागणी सानप यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
तहसीलदारांकडून राजकीय दबाव वापरून प्रकरणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न
भुसावळ तहसीलदार निता लबडे याच लाच प्रकरणात मास्टरमाईंड असून त्यांच्या संमतीने भुसावळ शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू व्यवसाय सुरू आहे शिवाय कोतवाल, तलाठी व खाजगी इसमांकडे आढळलेली रोकड व लाच रक्कम ही तहसीलदारांच्या सांगण्यावरून गोळा झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्याने त्या राजकीय दबाव वापरून एसीबीच्या कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केदार सानप यांनी केला आहे. एसीबीच्या अधिकार्यांनी प्रामाणिकपणे या प्रकरणाची सखोल चौकशी करून तहसीलदारांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा सानप यांनी व्यक्त केली आहे.
तहसीलदारांसह आरोपींचे कॉल डिटेल्स तपासावेत
एसीबीने सापळा यशस्वी करण्याच्या दिवसाचे तसेच त्या दिवसाअगोदरचे या प्रकरणातील तीनही आरोपींचे तहसीलदारांसोबत काही व्हॉटसअॅप तसेच कॉलवर बोलणे झाले आहे वा नाही? या संदर्भात कॉल्स डिटेल्स तपासावेत, अशी मागणी सानप यांनी केली आहे. यापूर्वीही तहसीलदारांनी जेसीबी सोडल्याची तक्रार सानप यांनी केली असून अद्यापही त्या प्रकरणात कारवाई झाली नसल्याचे सानप कळवतात.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
भुसावळ तहसीलदार निता लबडे यांची लाच प्रकरणात निपक्ष चौकशी करावी तसेच त्यांना आरोपी करावे, अशी मागणी सामजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी 15 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस अधिक्षक भरत तांगडे, जळगाव पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज ईमेलद्वारे केली आहे. दरम्यान, कारवाईकडे भुसावळ शहर व तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.



