भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ रेल्वे विभागातर्फे हर घर तिरंगा या अभियानाच्या अनुषंगाने दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी एक भव्य तिरंगा सायकल रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीमध्ये भुसावळ विभागातील शाखाधिकारी, रेल्वे कर्मचाऱ्यांसोबतच मध्य रेल्वे विद्यालय, भुसावळ येथील विद्यार्थ्यांनीही उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला.


ही सायकल रॅली सकाळी विभागीय कार्यालय भुसावळ येथून सुरू झाली आणि ऑर्डनन्स फॅक्टरी मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा विभागीय कार्यालय परत आली. रॅली दरम्यान सर्व सहभागींच्या हातात तिरंगा फडकत होता आणि भारत मातेच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे देशभक्तीची भावना जनमानसात जागवणे, तरुण पिढीमध्ये राष्ट्राभिमान वाढवणे व “हर घर तिरंगा” मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाच्या मनात तिरंग्याबद्दलचा अभिमान अधिक बळकट करणे हे होय.



