भुसावळ (प्रतिनिधी ) – शब्दांशी केलेली मैत्री आयुष्याची शिदोरी समजायला हवी. कामधंद्यासाठी पुण्यात गेलाे. नाेकरी मिळाली नाही म्हणून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. दुपारच्या वेळी विश्रांती न घेता रद्दीच्या दुकानात कथा, कविता, कादंबऱ्यांची पुस्तके अधाशासारखी वाचून काढली. शब्द सामर्थ्य वाढल्याने पुढे जाऊन कविता लिहिल्या. त्यात जगणं, भवताल मांडल्याने त्या लाेकांच्या काळजाला भिडल्या. कालांतराने देश-विदेशात कवितांचे कार्यक्रम गाजवले. त्यातून मिळणाऱ्या मानधनाने पाेटाची भूक तर भागवलीच पण जागतिक किर्तीही मिळवून दिली. जगणं जेव्हा कवितेत येतं तेव्हा तिचा रंग आणि ढंग बदलताे, अशा शब्दात सांगलीचे कवी नितीन चंदनशिवे यांनी आपला जीवनप्रवास उलगडला.
भुसावळात जय गणेश फाउंडेशनने स्वर्गीय द्वारकाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला आयाजित केली हाेती. त्यात शनिवारी कुऱ्हे पानाचे येथील रा. धाे. माध्यमिक विद्यालयात ‘माझी कविता, माझं जगणं’ या विषयावर समाराेपाचे तृतीय पुष्प गुंफताना कवी चंदनशिवे बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर हाेते. सचिव प्रमाेद छाजेड, संचालक श्याम बडगुजर, मुख्याध्यापक एस. पी. चाैधरी, जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, सचिव तुकाराम आटाळे हे व्यासपीठावर हाेते. कार्यक्रम सूत्रसंचालन योगेश गांधेले यांनी केले. जळगाव जिल्ह्यात विद्यार्थी केंद्रबिंदू ठेऊन सुरू असलेली द्वारकाई व्याख्यानमाला पथदर्शी आहे. विद्यार्थ्यांना वाचन, श्रवणाची गोडी लागण्यासाठी ती पूरक ठरेल. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी या उपक्रमातून बाेध घेतला पाहिजे. समाजाेन्नतीसाठी आजमितीला अशा उपक्रमांची नितांत गरज आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर यांनी व्यक्त केले.

जीवनात जे जगलं ते कवितेत मांडलं
जीवनात जे उपभाेगलं, जगलं ते कवितेतून मांडले. महाविद्यालयीन जीवनात ‘चांदणं’ ही कविता लिहिली. स्पर्धेत ती वाचनाऐवजी जागेवर सुचलेली ‘या चांदण्यांचा जर ठेचा केला असता तर भाकरीची चिंता मिटली असती’ या ओळी सादर केल्या. परीक्षकांना त्या इतक्या आवडल्या की पहिले पारिताेषिक मिळाले हाेते. तेव्हापासून कवितेच्या प्रांतात कधीच मागे फिरून पाहिले नाही. देश-विदेशात मराठीत जगण्याच्या कविता ऐकवल्याचा अानंद आहे असे कवी चंदनशिवे यांनी या व्याख्यानातून नमूद केले.
कवितेने प्रश्नांची उत्तरे शाेधावी
कवितेने समाजाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शाेधली पाहिजे. त्यासाठी माणुसकीचे गीत म्हणायला हवे. हे सांगताना चंदनशिवे यांनी ‘पाखरांच्या चाेचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता’ या ओळी सादर केल्या. विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचा आधार घेऊन जीवनमूल्ये अंगीकारावी. शिक्षण ही केवळ पदवी मिळवण्याची प्रक्रिया नसून माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे. जाती-जातीत, धर्मा-धर्मात भेदाभेद झाल्याने भारतीयत्व हरवत चालले आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
शब्द सामर्थ्य माणसाला माेठे करते
माणसाला उजेडात आणण्याचे सामर्थ्य शब्दात आहे. पण ते कसे वापरावे यासाठी डाेळे उघडे ठेवायला हवे. कवितेची पालखी वाहून नेताना खुप आनंद हाेताे आहे. कष्टकरी, कामगाराच्या मुलाला आज विदेशातील लाेक मराठी कविता ऐकवण्यासाठी बाेलवतात यापेक्षा आणखी काय हवे. हे सांगताना चंदनशिवे यांनी ‘पांडुरंगा’ ही कविता सादर केली. त्यातून शेतकरी आत्महत्या हा संवेदनशील विषय त्यांनी ताकदीने मांडला. ‘कांबळे’ कवितेतून त्यांनी चळवळीचा कार्यकर्ता कसा असताे हे वास्त मांडले. रसिकांना ते प्रचंड भावले.


