मलकापूर, – बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती आज २९ जुलै रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डान पुलावर भीषण अपघात झाला. दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २५ ते ३० जण जखमी झाले आहेत.यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एम एच ०८.९४५८ ही ट्रॅव्हल अमरनाथची तिर्थयात्रा करुन हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये ३५ ते ४० ते तिर्थयात्री होते. तर एम.एच २७ बी.एक्स. ४४६६ या ट्रॅव्हल्समध्ये २५ ते ३०प्रवाशी होते.या दोन्ही ट्रॅव्हल्स समोरा समोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातत सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सदर अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तातडीनं मदत कार्य सुरू केले आहे.
या अपघातात जखमी झालेल्यांना पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी पोलिसांच्याच वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलविण्याचे समजते.


