शाळा सुरू असताना शिक्षकांना बी एल ओ ची काम देणे हा तर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान – प्र. ह.दलाल.

भुसावळ (प्रतिनिधी ) –
शाळा नुकत्याच सुरू झालेल्या असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून अध्यापनाला प्रारंभ केलेला आहे विविध प्रपत्र भरणे, पुस्तकांचे वितरण करणे यासह पुढील महिन्यात होणाऱ्या घटक चाचणीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे ही कामे सुरू आहेत. आणि नेमकी याच वेळी जिल्ह्यातील अनेक माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बी एल ओ ची काम करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांनी लेखी आदेश देऊन त्याबाबत सक्तीही करण्यात आली आहे.
वास्तविकता शिक्षकांना अशी अशैक्षणिक कामे न देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्रमांक 56 59/2007 च्या निर्णयात परिच्छेद क्रमांक 32 मध्ये स्पष्ट आदेश देताना म्हटले आहे

बीएलओची कामे शिक्षकांना देणे अनिवार्य असेल तर ती फक्त शाळेला सुट्टी असेल अध्यापनाचा काम नसेल त्याचवेळी द्यावेत शाळा आणि अध्यापनाचे काम सुरू असताना अशी कामे देऊ नये त्याशिवाय मानव संसाधन मंत्रालय नवी दिल्ली यांनी दिनांक 13 सप्टेंबर 2010 अन्वये सर्व शिक्षण सचिवांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनापत्रात सुद्धा वरील प्रमाणेच आदेश दिलेले आहेत याशिवाय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनीही याचिका क्रमांक 417/2020 च्या निर्णयात देखील वरील प्रमाणेच आदेश दिलेले आहेत. तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 27 नुसार शिक्षकांना व शैक्षणिक कामासाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांनी 23 ऑगस्ट 2024 रोजी एक स्पष्ट आदेश काढून शैक्षणिक आणि अशैक्षणिक काम नेमकी कोणती आहेत याबाबत परिशिष्ट “अ” आणि परिशिष्ट”ब” या स्पष्ट केले आहे.

ज्यांचा शिक्षण विभागाशी संबंध नाही, अन्य विभागांची परंपरागतरीत्या जी कामे असतात ती कामे, यांचा शिक्षण शी संबंध नाही अशी कामे शासनाच्या कोणत्याही विभागाने शिक्षकांना करण्याचे बंधनकारक करू नये प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमितपणे चालणारी कामे विविध सर्वेक्षण ही अशैक्षणिक कामे अन्य विभागाने शिक्षकांना बंधनकारक करू नये असा स्पष्ट शासनादेश राज्याचे उपसचिव यांनी यांनी राज्यातील सर्व विभागांना निर्गमित केलेला आहे


एवढे सर्व असून देखील महसूल विभागातील अधिकारी शिक्षकांना बी एल ओ ची कामे करण्याची सक्ती करीत आहे हे आश्चर्यच आहे शासनाच्या आदेशाला शासनाच्याच विभागाने झिडकारने,ही बाब नुसती खेदाचीच नाही तर शासनाच्या विविध विभागात असलेला विसंवाद ही स्पष्ट करतो तेव्हा जळगाव जिल्ह्यातील कोणत्याच शिक्षकांना ही अशैक्षणिक कामे करण्याची सक्ती करू नये या बाबत मा.जिल्हाधिकारी यांनी आपल्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांना त्वरित आदेशित करावे अशी मागणी जेष्ठ शिक्षक नेते व भाजपा शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्र. ह.दलाल यांनी एका पत्रकान्वये केली आहे