कंडारी जिल्हा परिषद शाळेत आषाढी एकादशीनिमित्त पालखीसह ग्रंथदिंडी

जळगाव – आषाढी एकादशी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व भक्तीमय परंपरेतील एक महत्त्वाचा सण आहे. हाच अध्यात्मिक आणि सामाजिक संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आषाढी एकादशीनिमित्त पालखीसह ग्रंथदिंडी उत्साहात काढण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला शाळेच्या प्रांगणात विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. त्यानंतर टाळ, मृदंग, अभंग, भक्तिगीते आणि नामस्मरणाच्या गजरात शाळेच्या आवारात बालदिंडीने मिरवणूक काढली. कृष्णा भील याने श्रीविठ्ठलाची वेशभूषा साकारली. त्यासाठीची सजावट मंजुषा पाठक व सुनंदा रोझदकर यांनी केली. अनेक विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण केली होती. कंडारी येथील पंचरंगी भजनी मंडळाचे गोपाळ रिवाजकर, रवी धनगर, प्रभाकर धनगर, राजू सोनवणे, गोलू धनगर, विठोबा धनगर यांनी दिंडीत भजने म्हटली. दिंडीत विशेष आकर्षण पालखीसह ग्रंथदिंडी ठरली. सजवलेल्या पालखीत श्रीविठ्ठलाचा फोटो आणि बालभारतीचे पाठ्यपुस्तक ठेवण्यात आले. या उपक्रमाने वाचन संस्कृतीच्या प्रसाराला नवी दिशा मिळाली. काही विद्यार्थिनींनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतले होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेमध्ये पुन्हा एकदा सामूहिक नामस्मरण व अभंग गायन करण्यात आले. यावेळी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करून पावली व फुगडी खेळली आणि नामस्मरणाचा गजर केला. यशस्वीतेसाठी मंजुषा पाठक, राजाराम पाटील, सुनंदा रोझदकर, सविता निंभोरे, ज्योती वाघ, डॉ. जगदीश पाटील, विनोद जयकर, गणेश तांबे, शाम चिमणकर आदी शिक्षकांनी सहकार्य केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका मंजुषा पाठक म्हणाल्या की, आषाढी एकादशीचे हे आयोजन केवळ धार्मिक नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, परंपरा, संस्कार, वाचनाची गोडी, समाजाशी जोड आणि कला प्रतिभा विकसित करणारे आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनविषयक जाणीव निर्माण होवून त्यांच्यात भारतीय सांस्कृतिक मूल्यांची बीजे रोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आजची दिंडी ही विद्यार्थ्यांसाठी एक चालतीबोलती शाळा आहे, असेही त्या म्हणाल्या.