प्रचलित परीक्षा नियोजन ठेवावे; राज्य शिक्षक परिषदेची मागणी-२५ एप्रिलपर्यंत परीक्षा चालल्या तर सर्वच नियोजन कोलमडण्याचे संकट ;


भुसावळ , (प्रतिनिधी )–
राज्यातील सर्व शाळांमध्ये १ ली ते ९ वी वर्गाच्या परीक्षा ८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान घेऊन १ मे रोजी निकाल देण्याचे आदेश शिक्षण विभागाने पारित केले आहेत. मात्र, पाच दिवसांत पेपर तपासून निकाल कसा तयार करायचा हा प्रश्न शाळांसह शिक्षकांना पडला असल्याने जुनीच पद्धत लागू ठेवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सध्याच्या पद्धतीनुसार परीक्षा आयोजित करणे हे शाळा स्तरावरचे नियोजन केले जाते. वाढता उष्मा, शाळेतील भौतिक सुविधा, शिक्षक-विद्यार्थी संख्या, उत्तरपत्रिका तपासणे, गुणतक्ते तयार करणे, वार्षिक परीक्षा नोंदवहीत निकाल नोंदवणे, विद्यार्थी निहाय स्वतंत्र गुणपत्रक भरणे, प्रमोशन नोंदी घेणे आणि इयत्ता अखेर शाळेतून बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे दाखले तयार करणे आणि महाराष्ट्र दिनी (१ मे) निकाल जाहीर करणे, अशी सर्व परीक्षा विषयक कामे केली जातात. मात्र, त्याला किमान वीस लागतात. मात्र आता नवीन आदेश आल्याने फजिती होणार आहे. नवीन विद्यार्थी प्रवेश शाळा पूर्वतयारी नियोजन करणे हे सुद्धा महत्त्वाचे काम त्या वेळेत असते. 25 एप्रिल पर्यंत परीक्षा घेण्याची वेळापत्रक सुसंगत नसल्याने त्यात बदल करावा अशी मागणी शिक्षकांमधून जोर धरत आहे ज्या शिक्षकांकडे शेवटच्या विषयांचे पेपर तपासणीला असतात त्यांच्याकडे एकापेक्षा अनेक वर्गांचे गठ्ठे तपासणीसाठी असल्याने त्यात मोठी धावपळ होईल. उत्तर पत्रिका तपासणी, संकलित निकाल तयार करणे ,गुणपत्रके तयार करणे, संजय पत्रके भरणे अशी अनेक कामे चार ते पाच दिवसात पूर्ण करणे शक्य होणार नाही. माध्यमिक शाळेत विषयानुसार शिक्षक असल्याने प्रत्येक शिक्षकाकडे एकापेक्षा अनेक विषय असतात त्यामुळे तपासणी करून निकाल कामी वेळ हा कमी पडणार आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत विद्यार्थी हिताच्या दृष्टीने ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे यात बदल करणे आवश्यक आहे. असे राज्यशिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश एस नेमाडे यांनी सांगितले.

पाच दिवसांत निकाल कसा तयार करायचा? शिक्षकांचा सवाल—
महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, उपाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित, सचिव नंदकुमार सागर, उपाध्यक्ष सचिन नलावडे आदींनी पॅट व वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यासाठी शिक्षण आयुक्त व एससीईआरटी चे संचालक यांना याबाबत निवेदन दिले. पेपर तपासणे, मॉडरेटिंग, निकाल तयार करणे, ग्रीन बुक भरणे, मुख्याध्यापकयांच्या यावर तपासून सह्या होणे इत्यादी कामासाठी फक्त चार दिक्साचा कालावधी मिळणार आहे. या वेळेत ही सर्व कामे होऊ शकत नाहीत महणून सदर वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी केली असल्याची माहिती राज्यशिक्षक परिषदेचे जिल्हा नेते, तळवेल हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. अहिरे यांनी दिली. आर. टी. ई. मधील तरतुदीनुसार चाचण्या व परीक्षा घेण्याचे नियोजन , उत्तरपत्रिका तपासणे, संकलित निकाल तयार करणे, प्रगती पुस्तके लिहिणे, संचयी नोंदात्रक लिहिणे इत्यादी कामे चार ते पाच दिवसांत होऊ शकत नाहीत.

विद्यार्थ्यांच्या खेळण्या बागडण्यावर निर्बंध…..

खासगी क्लास, शाळा, अभ्यास यामध्ये मुलांना मैदानावर खेळायला फार कमी वेळ मिळतो. सुटीच्या दिवशी किमान खेळण्यावर यामुळे निर्बंध येणार आहेत. १४ एप्रिलनंतर विद्याथ्यांना सुट्टी दिली जाते. या वेळापत्रकाच्या आधारेच दरवर्षीच्या अंदाजानुसार पालकांनीही सुट्ट्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे अचानक त्यात बदल करून २५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेतल्यास शाळांचे व पालकांचे तसेच मुलांचे मामाच्या गावाला तसेच इतरत्र आवश्यक त्या ठिकाणी जाण्याचे नियोजनही कोलमडणार आहे.
माध्यमिक शाळेत विषय निहाय शिक्षक असतात. चार ते पाच दिवसात तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही. त्यात कडक ऊन, पिण्याच्या पाण्याची टंचाई या सर्व गोष्टींचा विचार करता एवढ्या उशिरापर्यंत परीक्षा ठेवणे योग्य होणार नाही. त्यामुळे वेळापत्रकात बदल दर करण्याची मागणी राज्यशिक्षक परिषदेचे जिल्हा नेते एस. एस. अहिरे, जिल्हाध्यक्ष गिरीश एस नेमाडे यांनी केली आहे.