भुसावळात लेडीज रनच्या सराव सत्रास उत्साहात प्रारंभ : पहिल्याच दिवशी १०० धावपटूंची उपस्थिती :


भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित बिसारा लेडीज रनच्या सराव सत्रास उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी १०० धावपटूंची उपस्थिती होती. ९ मार्च रोजी आयोजित या स्पर्धेत ३ किमी, ५ किमी व १० किमी या तीन गटात महिला धावणार असून आकर्षक बक्षिसे देखील आयोजकांतर्फे ठेवण्यात आली आहेत. दर मंगळवार, गुरुवार व रविवारी सराव सत्राचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेच्या आधी सर्व महिलांनी योग्य सराव करून स्पर्धेत सहभाग घ्यावा जेणेकरून स्पर्धेच्या दिवशी कुठलीही दुखापत न होता सहज रन करता यावा हे या सराव सत्रांच्या आयोजनामागील हेतू आहे. त्यामुळे शहरातील अधिकाधिक महिलांनी या सराव सत्रांत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. शिवाय हे सराव सत्र नि:शुल्क असून सर्वांसाठी खुले आहे. सकाळी ६ ते ७ या वेळेत रेल्वे क्रीडांगणासमोरील कृष्णचंद्र सभागृहाजवळ या सराव सत्राचे आयोजन करण्यात येते.
सकाळी ६ वाजता प्रा प्रविण फालक यांच्या मार्गदर्शनात सुरुवातीला वॉर्मअप व्यायाम घेण्यात आला. त्यानंतर महिला उद्योजक व स्वतः उत्तम धावपटू असलेल्या सौ मंगला पाटील यांच्या हस्ते विधिवत नारळ फोडून सराव सत्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बालधावपटू अवनी चंदन हिचे देखील विशेष स्वागत डॉ निलिमा नेहेते व डॉ चारुलता पाटील यांनी केले. त्यानंतर प्रत्यक्ष धावण्यास सुरुवात झाली. असोसिएशनच्या नियमित महिला धावपटू नव्याने धावायला सुरुवात केलेल्या महिलांना धावण्याचे सर्व बारकावे सांगत होत्या व त्यांच्या सोबत धावत होत्या. त्यामुळे केवळ १ किमी पायी चालण्याची सवय असतांना पहिल्याच दिवशी सहजपणे ३ किमी धावू शकले असे यावेळी जयश्री चौधरी, डॉ सुवर्णा जावळे,पल्लवी अंबाडे,रत्नमाला भोळे, संगीता नेमाडे,कविता पाचपांडे,कोमल चंदन, वीणा सेन यांनी सांगितले. त्यानंतर मैदानावर परतून शास्त्रीय पद्धतीने स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार घेण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी केले. यावेळी डॉ तुषार पाटील, गणसिंग पाटील, प्रविण वारके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किर्ती मोतळकर, संजय तिवारी, पुष्पा तिवारी,सीमा पाटील,वर्षा वाडीले, आरती चौधरी, माया पवार, निलांबरी शिंदे ,संजीवनी लाहोटी, मंगेश चंदन,राजेंद्र घाटे, प्रकाश अटवाणी यांचे सहकार्य लाभले.
इंदोरहून आलेले ७२ वर्षीय किशोर मारू व ७० वर्षीय मनोरमा मारू यांनी सर्वांचे कौतुक केले व चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.