मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात : तिघे जागीच ठार :

मुंबई – राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सातत्याने जनजागृतीसह विविध उपाययोजना केल्या जात असल्यातरी अपघात मात्र थांबत नसल्याचे चित्र आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर पाच वाहनांमध्ये विचित्र अपघात होवून तिघे जागीच ठार झालेत. या दुर्घटनेत 14 प्रवाशी जखमी झाले.
शहापूरच्या गोठेघरजवळ बुधवारी भल्या पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात घडला. त्यात एका मालवाहतूक करणार्‍या ट्रकला एका खासगी प्रवासी बसने धडक दिली. त्यानंतर या बसला तिच्या मागे असणार्‍या इतर तीन वाहनांनी धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात तीन जण जागीच ठार झाले, तर इतर 14 जण जखमी झाले. जखमींपैकी तब्बल आठ जणांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.