भुसावळ – . भुसावळातील 27 वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता भुसावळातील खडका रोडवरील अमरदीप टॉकीज जवळील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात घडली. तेहरीन नासीर शेख (27, मचछीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जाम मोहल्ला भागातील आर.के.किताब घरासमोरील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात तेहरीन नासीर शेख (27, मच्छीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) हा चहा पिण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता आल्यानंतर दोन दुचाकीवर तोंडाला रूमाल बांधून आलेल्या चार संशयीतांपैकी तिघांनी आपल्याकडील गावठी पिस्टलातून पाच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने दुकानातील ग्राहकांमध्ये पळापळ झाली तर काही क्षणात संशयीत दुचाकीवरून पसार झाले.
शरीरातील विविध भागात पाच गोळ्या लागल्याने तेहरीनचा जागीच मृत्यू झाला तर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्यांनी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज शोधणे तसेच चार संशयीतांचा कसून शोध घेणे सुरू आहे.

फेब्रुवारी 2023 मध्ये भुसावळ शहरात तरुणाचा खून झाला होता. सदर खुनाच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे . मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान पुन्हा खून झाल्यामुळे भुसावळ शहरात एकच खळबळ उडाली आहे. खुनाच्या घटनेमुळे भुसावळ शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.



