भुसावळ – विवाह पंचमी निमित्त श्री बड़ा हनुमान मंदिर येथे प्रभू श्रीराम व माता सीता यांचा विवाह प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला .

हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला विवाह पंचमी म्हटले जाते . त्रेता युगात या दिवशी राजा दशरथ यांचे पुत्र प्रभू श्रीराम व मिथिला नरेश जनक यांची पुत्री माता सीता यांचा विवाह संपन्न झाला होता . हा विवाह नुसता विवाह नसून मर्यादा ,धर्म, आणि कर्तव्य यांच्या आदर्शाचा प्रतीक आहे.
असे म्हटले जाते की या दिवशी भगवान राम व माता सीता यांची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख शांती समृद्धी येते. ज्यांच्या विवाह कार्यामध्ये विविध अडचणी येत असतील त्यांनी या दिवशी भगवान राम व माता सीता यांची पूजा केल्याने त्यांच्या विवाह संबंधातील सर्व अडचणी दूर होऊन लवकरच त्यांचा विवाह होतो . या दिवशी पूजापाठ केल्याने पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये नात्यांचा गोडवा निर्माण होतो . असे हे विवाह पंचमीचे मंगलमय पर्व भक्तांना भक्ती आणि समर्पणाची भावना यांच्याशी जोडते ,तसेच राम सीता यांच्या दिव्य प्रेमाची आठवण करून देते.
अशा या विवाह पंचमी निमित्त भुसावळ शहराचे आराध्य दैवत असलेले राम मंदिर वार्डातील प्राचीन श्री बडा हनुमान मंदिरामध्ये आज दिनांक ६ शुक्रवार रोजी विवाह पंचमीनिमित्त भगवान श्रीराम व माता सीता यांच्या विवाहाचा वाढदिवस प्रचंड उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला.

यावेळी सकाळी सहा वाजता रामाला व सीताला पंचामृताने महा अभिषेक करण्यात आला. स्नान केल्यानंतर सुंदर वस्त्रे व मुकुट प्रधान करून आकर्षक असा शृंगार रचना प्रभू श्रीराम व माता सीतेची करण्यात आली. दुपारी बारा वाजता सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाआरती करून उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला .यानिमित्त सायंकाळी विवाह गीतांचा म्हणजेच भजनांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री बड़ा हनुमान मंदिराचे महंत प्रशांत रामदासजी वैष्णव, भारती वैष्णव, विमल वैष्णव, मेघा वैष्णव यांनी परिश्रम घेतले.


