भुसावळ – एलआयसी व म्यॅच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळतील, असे आमिष दाखवून व्यवहार घरपोच करून देण्याची तयारी दाखवत जळगावच्या दोघांनी भुसावळातील तापील नगरातील 65 वर्षीय वयोवृद्धाला 19 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी सोमवार, 25 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रदीपसिंह प्रतापसिंह परदेशी (65, रा.तापी नगर, भुसावळ) हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला असून ते सेवानिवृत्त आहेत. 10 मार्च 2023 ते 6 डिसेंबर 2023 च्या दरम्यानच्या काळात जळगावातील संदीप चौधरी व सोनाली चौधरी यांनी प्रदीपसिंह परदेशी यांना बँकेचे व्यवहार घरपोच करून देऊन एलआयसी व म्यॅच्युअल फंडमध्ये चांगले रिटर्न मिळवून देऊ, असे सांगून विश्वास संपादन करून त्यांच्याकडून कॅश, ऑनलाईन व चेकद्वारे तब्बल 19 लाख 405 रुपये स्वीकारले व त्या मोबदल्यात बनावट व हुबेहूब दिसणारे कागदपत्र तयार करून त्यांच्या घरी आणून अपहार केला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रदीपसिंह परदेशी यांनी सोमवार, 25 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी संदीप चौधरी व सोनाली चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड करीत आहे.


