(बोदवड ( प्रतिनिधी) – येथील बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास कक्ष, बोदवड आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान अंतर्गत द्वितीय कार्यक्रम दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी ऋतुमती/विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळी व त्यांच्या समस्या याविषयी जागृती पर व्याख्यान देण्यासाठी तुलसी हॉस्पिटल बोदवड येथील डॉ. वर्षा कोळंबे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी होते. सोबत विद्यार्थी विकास कक्षाचे अधिकारी, डॉ. अजय पाटील, डॉ. मनोज निकाळजे व डॉ. रूपाली तायडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थिनींना संबोधित करताना सांगितले की, आपल्या आरोग्याचे आपण संवर्धन केले तर आपल्या जीवनाचे संवर्धन करणे शक्य होते. सोबतच आरोग्य संवर्धन करत असताना प्रत्येकाने आपले सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने रोज आठ तास झोप घेणे, व्यायाम करणे, योगा व प्राणायाम करणे, सकारात्मक गोष्टींचा सतत विचार करणे, चांगला आहार व विहार करणे आवश्यक आहे तरच आपलं आरोग्य चांगलं राहू शकते अशा अनेक गोष्टींचा त्यांनी ऊहापोह केला.
डॉ. वर्षा कोळंबे यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या आधी, दरम्यान आणि नंतर ज्या विविध समस्या उद्भवतात त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होत असते याबाबत अवगत केले. या संदर्भात मुलींनी कशा प्रकारची दक्षता घेणे आवश्यक आहे ते देखील सांगितले. मासिक पाळीच्या संदर्भात मुलींना जी काही समस्या जाणवत असेल ती अंगावर न काढता आपल्या आईसोबत आणि मैत्रिणींसोबत चर्चा करून वैद्यकीय सल्ला ताबडतोब घेतला पाहिजे जेणेकरून महिलांच्या संदर्भात आता जे काही अनेक आजार उद्भवताना दिसत आहेत त्यातील एक कारण म्हणजे मासिक पाळीचे असू शकते असे संशोधनातून समोर आलेले आहे.
मुलींनी आपल्या आरोग्याचे संवर्धन करत असताना कुठल्या प्रकारचा आहार घ्यावा, कसा घ्यावा तेही विशद केले. व्यायाम आणि प्राणायाम हा देखील तितकाच आवश्यक आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींना देखील पुष्टी दिली. एवढेच नव्हे तर दिनांक 27 सप्टेंबर रोजी हिमोग्लोबिन आणि सीबीसी चाचणीचे रिपोर्ट्स वाचून विद्यार्थिनींना वैद्यकीय सल्ला देखील दिला.
उपरोक्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मनोज निकाळजे यांनी केले, सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी, डॉ. अजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला विद्यार्थी विकास अधिकारी, डॉ. रूपाली तायडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निकिता गोरे, आचल गायकवाड, भावना शिंगोटे, नेहा चौधरी, नम्रता धांडे, साक्षी खाचने, नम्रता चौधरी, मयुरी पाटील , पल्लवी हरणे, अंकिता उचाडे, रेखा शेजोळे, ईशा वंजारी, इत्यादी विद्यार्थिनींनी सहकार्य केले.



