वरणगांवच्या एपीआय भरत चौधरींची तडकाफडकी बदली ; सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांची नियुक्ती :

( बदलीचे कारण गुलदस्तात – राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण )

वरणगांव । प्रतिनिधी

वरणगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत यशवंत चौधरी यांची आज तडकाफडकी बदली झाली आहे . वर्षभराच्या कालावधीतच नेमकी कोणत्या कारणामुळे बदली झाली याचे कारण पोलीस प्रशासनाकडून स्पष्ठ झाले नसले तरी वर्षभरातील कारकीर्द आर्थिक देवाण – घेवाण , गुन्ह्यांचा तपास , विनाकारण शासकीय कामात अडथळा आणणे बाबत गुन्हा दाखल करणे अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या बाबतीत वरीष्ठ अधिकाऱ्यां पर्यंत तक्रारी गेल्या होत्या . यामुळे त्यांची अचानक बदली झाल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे .

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वरणगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांची आपल्या चांगल्या कारकिर्दीमुळे तब्बल साडेतीन वर्षांनी म्हणजेच दि . ३० नोव्हेंबर २०२३ रोजी बदली झाली . त्यानंतर जळगांव एमआयडिसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत यशवंत चौधरी यांचेकडे वरणगांव पोलीस ठाण्याचा पदभार सोपवण्यात आला . मात्र , त्यांनी पदभार स्विकारताच शहर व पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या परिसरात आपल्या कायद्याचा दंडका उगारून शासकीय कामात अडथळा आणणे असे किमान चार गुन्हे दाखल केले . तसेच शहरातील अवैध धंदे चालकांवर वचक निर्माण करून त्यांचेशी आर्थिक देवाण – घेवाणचे विषय , राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक , चोरीच्या व खुनाच्या घटनांमध्ये झालेली वाढ यासह त्यांच्या विरोधात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असल्याची कारणे पुढे येत आहेत . यामुळेच वरीष्ठ स्तरावरून दखल घेऊन त्यांची तडका – फडकी बदली झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असलीतरी बदलीचे खरे कारण अद्याप गुलदस्त्यात असुन त्यांचे जागेवर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांची नियुक्ती झाली आहे . तर सहायक पोलिस निरीक्षक भरत यशवंत चौधरी यांनीही माझी बदली झाली असल्याच्या विषयाला दुजोरा दिला असुन नवनियुक्त एपीआय जनार्दन खंडेराव यांनी सांयकाळी अवघ्या दहा मिनीटात पदभार घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली . तर दुसरीकडे भरत चौधरी हे राजकीय षडयंत्राचे बळी ठरल्यानेच त्यांची तडका फडकी बदली झाल्याची चर्चाही सुरू झाली असुन त्यांच्या बदलीचे खरे कारण गुलदस्त्यात आहे .