भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकका द्वारे दत्तक गाव किन्ही येथे स्वच्छता ही सेवा आणि महिला सशक्तिकरण या उपक्रमाअंतर्गत एक दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीत महिलांना स्मशानभूमीत प्रवेश दिला जात नाही, अशा अंधश्रद्धा व प्रथांना मोडीत काढण्यासाठी गावातील स्मशानभूमीची साफसफाई रासेयो स्वयंसेवकांमार्फत करण्यात आली. तसेच सरपंच सौ. सोनवणे यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या

. शिबिरा दरम्यान गावात साफसफाई करून कचरा संकलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व आणि बेटी बचाव बेटी पढाव या विषयावरती सामाजिक प्रबोधन केले. दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तर सर्वोदय हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री. एम. एम. चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रा. पी . ए. अहिरे यांनी स्वच्छता ही सेवा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच माजी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.आर. एस. नाडेकर यांनी एन.एस.एस. स्थापना दिवस आणि महात्मा गांधीजी यांचे योगदान या विषयावर प्रकाश टाकला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी महाविद्यालयीन जीवनात एन.एस.एस. मुळे विद्यार्थी सामाजिक दृष्ट्या सुज्ञान होतात आणि राष्ट्रनिर्मितीसाठी हातभार लावतात असे प्रतिपादन केले. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांची समाजाप्रती नाळ जोडण्यासाठी एनएसएस हे उत्तम व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास महिरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. साहेबराव राठोड, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. संगीता भिरूड आणि विद्यार्थ्यांनी यांनी परिश्रम घेतले.


