पोळ्याच्या दिवसाचा किरकोळ वाद यात्रेच्या दिवशी आला उफाळून : वझरखेडा येथील प्रकार – परस्पर विरोधी अदखल पात्र गुन्हे दाखल :

वरणगांव –

तालुक्यातील वझरखेडे येथे पोळ्याच्या दिवशी झालेल्या किरकोळ वादाचे पडसाद काल रात्री झालेल्या मरी माता यात्रोत्सवात उमटले . यात्रेत रात्रीत दोन गटात तुफान हाणामारी होवून काही जण जखमी झाले असल्याची माहिती असुन पोलीस ठाण्यात मात्र, अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असल्याने या प्रकारावर एक प्रकारे पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे .

याबाबत जनमाणसातुन मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ तालुक्यातील वझरखेडे येथे दि . १२ रोजी तालुक्यातील पहिलाच मरिमाता यात्रोत्सव होता . यामुळे यात्रोत्सवासाठी पंचक्रोशीतील नागरीकांनी गर्दी केली होती . यात्रोत्सवात खाद्यपदार्थ, लहान मुलांसाठी खेळण्याची दुकाने ( व इतर जुगाराचे अड्डे ) लागली होती . तसेच गावकऱ्यांनी लोक वर्गणीतून लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन केले होते . यामुळे सर्व आलबेल सुरू असतांना रात्री ११ वाजेदरम्यान पोळा सणाच्या दिवशी दोन गटात झालेला किरकोळ वाद या यात्रोत्सवात उफाळून आला आणि दोन्ही गटात तुफान हाणामारी होवून दगडफेक सुरू झाली . यामुळे यात्रेकरूंची एकच धावपळ उडाली . तर दोन्ही गटात झालेल्या हाणामारी दोन्ही गटातील काही जण किरकोळ जख्मी झाले . यामुळे काही सुज्ञ नागरीकांनी पोलीस ठाण्यात क्रमांक साधताच पोलीस प्रशासन तातडीने गावात हजर होवून त्यांनी टवाळखोर हल्लेखोरांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला . मात्र, काहींनी पोलीसांच्या दिशेनेही दगडफेक केल्याची माहिती मिळत असलीतरी सकाळी पोलीस प्रशासन व सरपंच यांनी हा वाद किरकोळ सांगितले . तर या घटनेबाबत पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील प्रत्येकी चार ते पाच जणांविरुद्ध परस्पर विरोधी अदखल पात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले .

घटनेला कारणीभुत कोण ?

वझरखेडे येथे पोळा या सणाच्या दिवशी नारळ फोडण्यावरून वाद निर्माण झाला होता . व दोन्ही गटाने आपण यात्रोत्सवाच्या दिवशी पाहून घेवू अशी चर्चा झाली होती . याची कल्पना बिट हवालदार, सरपंच व पोलीस पाटील यानांही होती . मात्र, यात्रोत्सवात झालेल्या हाणामारी दरम्यान यापैकी एकही जबाबदार नागरीक या ठिकाणी हजर नसल्याने या घटनेला कारणीभुत कोण याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे .