जळगाव /भुसावळ – नेपाळ देशामध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बस नदीत कोसळल्यानंतर त्यात जळगाव जिल्ह्यातील २५ भाविकांसह चालक व क्लीनरचा मृत्यू झाला होता. यातील सर्व २५ मृतदेह जळगावच्या विमानतळावर दाखल झाले असून ओळख पटवल्यानंतर ते वरणगाव, तळवेल, मुक्ताईनगरकडे रवाना झाले आहेत. दरम्यान नातेवाईकांना ओळख पटवल्यानंतर अश्रू अनावर झाले होते.

भुसावळ तालुक्यातील विविध गावातील भाविकांनी आयोध्येतील दिव्य श्रीराम कथा महोत्सव संपल्यानंतर देवदर्शनासाठी बस बुक केल्या होत्या. यातील दोन बस व टेम्पो ट्रॅव्हलर उत्तर प्रदेशातील देवदर्शन झाल्यावर नेपाळ येथे गेली होती. तेथे पोखरा येथे भेट झाल्यानंतर काठमांडूकडे जात असताना एक बस ही घसरल्याने नदीत कोसळून मोठा अपघात झाला होता. या अपघातामध्ये जळगाव जिल्ह्यातील २५ भाविकांसह चालक व क्लिनर मृत्युमुखी पडले आहेत. तर पाच जण गंभीर जखमी असून एक तरुणी बेपत्ता आहे.
दरम्यान २५ जणांचे मृतदेह शनिवारी दि. २४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता जळगाव विमानतळ येथे विशेष एअर ॲम्बुलन्सने दाखल झाले. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे सोबत होते. या वेळेला २५ ॲम्बुलन्स या धावपट्टी जवळ दाखल करण्यात आल्या होत्या. तर पंचनामासाठी तहसीलदार आणि वैद्यकीय पथक देखील तैनात होते.
विमानतळावर जिल्ह्यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार राजूमामा भोळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील उपस्थित होते. विमानतळावर ॲम्बुलन्स आल्यानंतर सर्व मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात येत होते. त्यानंतर तहसीलदार व वैद्यकीय पथकाकडून रीतसर ओळख, परिचय व पंचनामे करून रुग्णवाहिका या सगळ्यात शेवटी एकत्र बाहेर पाठवण्यात आल्या.


