बंधार्‍यात बुडाल्याने चौघा भावंडांचा मृत्यू : चाळीसगाव तालुक्यातील घटना –

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाजवळील केटी वेअरच्या बंधार्‍यात बुडून चौघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवार, 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली. चाळीसगाव शहर पोलिसांनी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने चौघा भावंडांचे मृतदेह काढले. शिवांजली सुभानिया आर्य (6), रोशनी सुभानिया आर्य (9), आराध्या सुभानिया आर्य (4) व आर्यन सुभानिया आर्य (5) अशी मृत भावंडांची नावे आहेत. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेने चाळीसगाव तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे
चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात सेंधवा येथील आदिवासी समाजाचे आर्य परिवार मजुरीसाठी म्हणून येथील उदय सुधाकर अहिरे यांच्याकडे आला गेल्या दीड वर्षांपासून अहिरे यांच्या शेतात आर्य परिवार कामाला आहे. त्यांच्या या परिवारात सुभाष सिंह यांच्यासह त्यांची पाच मुली आहेत. या परिवारातील मोठी मुलगी संजना ही भांडी घासण्यासाठी के. टी. वेअर धरणाच्या काठावर गेली असता अन्य भावंडेही सोबत गेली व पाण्यात खेळत असताना ही भावंडे बुडाली.
केटी वेअर बंधार्‍यात चिमुकल्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले. चारही सख्खे बहिण-भाऊ क्षणार्धात एकमेकांसोबत बुडाले. होत्याचे नव्हते झाले. ग्रामस्थांना समजताच त्यांनी धावाधाव केली. बंधार्‍यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी इम्रान खान,राजू नाईक,किरण सोनावणे या पट्टीच्या पोहणार्‍यांनी मदत घेण्यात आली. चाळीसगावचे प्रभारी निरीक्षक संदीप पाटील हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ.मंदार करंबळेकर यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.