पुण्यात दरोडा टाकून पसार झालेल्या तिघा आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक –

जळगाव : पुणे शहरातील चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकून पसार झालेल्या संशयीतांना जळगाव तालुक्यातील कानळदा गावातून अटक करण्यात आली. शुक्रवारी, 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता जळगाव गुन्हे शाखेने ही कारवाई केली. जितेंद्र उर्फ जितू प्रदीप वाघ (32, रा.वाघनगर), भूषण गोकुळ कोळी (27, रा.समता नगर) व चंद्रशेखर उर्फ चंदू रमेश देशमुख (23, रा.महाबळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पुण्यातील चतृ:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकून पसार झालेले संशयित आरोपी हे जळगाव तालुक्यातील कानळदा गावाजवळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी कॉन्स्टेबल रवींद्र कापडणे यांना मिळाली. त्यांनी लागलीच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पथक तयार करीत रवाना केले. या पथकाने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सापळा रचून कानळदा ते भोकर रस्त्यावर गावाच्या बाहेर एका टपरीजवळ बसलेल्या जितेंद्र उर्फ जितू वाघ, भूषण कोळी व चंद्रशेखर उर्फ चंदू देशमुख या तिघांना अटक केली.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, महेश महाजन, हेमंत पाटील, रवींद्र कापडणे, राहुल कोळी यांच्या पथकाने केली.