बापाच्या वेदना, संवेदना लेकींना आधी कळतात – भुसावळात द्वारकामाई व्याख्यानमालेत कवी रमेश पवार यांनी उलगडला हळवा कप्पा :

भुसावळ : बापाने वेदनांसोबत प्रतिभा, प्रतिष्ठा, मानमरातब मिळवून दिला. मी बापाविषयी काही लिहिलं की मायचं काळीज आभाळागत होतं नि टचकन तिच्या डोळ्यात पाणी येतं. बाप गणितात न मावणारं सूत्र आणि एक वेदनाशास्त्र आहे अशा शब्दांत अमळनेरचे कवी रमेश पवार यांनी काळजाचा हळवा कप्पा भुसावळात लेकींशी संवाद साधताना उघडला.

शहरातील जय गणेश फाउंडेशन आयोजित द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ द्वारकाई फिरत्या व्याख्यानमाला सुरू आहे. त्यात बुधवारी अहिल्यादेवी कन्या विद्यालयात तृतीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘लेकींनो बापाला मारा मिठी’ हा त्यांचा विषय होता. अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र मांडे होते. प्रमुख भुसावळ तालुका वकील संघाचे अध्यक्ष तुषार पाटील होते. विचारमंचावर मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली. जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. महेंद्र मांडे म्हणाले की द्वारकाई व्याख्यानमाला निरंतर दहा वर्षे सुरू असल्याने ती भुसावळ शहराचा सांस्कृतिक चेहरा बनली आहे. विद्यार्थ्यांची वैचारिक भूक या माध्यमातून भागते आहे. तुषार पाटील यांनीही हा उपक्रम महानगरातील सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना हेवा वाटावा असा असल्याचे गौरवोद्गार काढले. आभार समन्वयक गणेश फेगडे यांनी मानले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बाप लेकींचं काळीज असतं
लेक कितीही मोठी झाली तरी ती बापासाठी लहानचं असते. बापाचं दुखणं, खुपणं, वेदना, संवेदना या सर्वप्रथम तिलाचं कळतात. अर्थात, बाप हा तिचं काळीज असतं. बापाने संस्कारांची जी चौकट आखून दिली आहे ती कधीच ओलांडू नका. त्यांना वेदना होतील असं वागू नका असा सल्ला कवी पवार यांनी व्याख्यानातून दिला.

आठवणींनी दाटून आला हुंदका…
कवी पवार यांनी त्यांची ‘बापाची अंत्ययात्रा निघाली पाखरंही निघून गेली, आज पाखरांनी टिपली नाहीत अंगणातील दाणी’ ही कविता सादर करताना त्यांचा हुंदका दाटून आला. स्वर कातर झाला. त्यानंतर त्यांनी ‘बापाला नसतो ना पदर आसवं पुसायला म्हणून बापाची आसवं वाहत राहतात बेदखल बेदरकार’ या ओळी सादर करून रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला.

सोशल मीडियाचा अतिरेक टाळा…
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात आजची पिढी गुरफटली आहे. सोशल मीडियाच्या अतिरेकी वापराने ताणतणाव वाढत आहेत. ध्येय गाठण्यासाठी मोबाइल गरज असेल तितकाच अपवादात्मक परिस्थितीत वापरा. चांगल्या कथा, कादंबरी, काव्यसंग्रह वाचा असा सल्लाही कवी पवार यांनी दिला.