भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा धुळे जिल्ह्यातील लळिंग येथे मृत्यू –


धुळे : तालुक्यातील लळिंग शिवारात भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरची धडक दोन महिलांना बसली. यात भुसावळ येथील महिला ठार तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सायंकाळी पाच वाजता मोहाडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील लळींग शिवारात सर्विस रोडवरील पीरबाबा दर्गाजवळ काही महिला पाणी पिण्यासाठी थांबलेल्या होत्या. गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास एमएच १८ बीजी १४०८ क्रमांकाचा डंपर भरधाव वेगात आला. या डंपरची धडक उभ्या असणाऱ्या दोघा महिलांना बसली. यात जमनाबाई रामदास भिलावे (वय ६६, रा. कंडारी ता. भुसावळ) आणि द्वारकाबाई दादाभाई नेवरे (वय ५२, रा. चितोड ता. धुळे) या दोघांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

जखमी अवस्थेत दोन्ही महिलांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार घेत असताना जमनाबाई भिलावे या महिलेचा मृत्यू झाला. दुसऱ्या महिलेवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दादाभाई नेवरे (वय ३५, रा. चितोड ता. धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहाडी पोलिसात गुरुवारी सायंकाळी ५ वाजता फरार डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.