विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे : महेश वाघमोडे : व्हाईस ऑफ मिडीया तर्फे पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव ;

भुसावळ (प्रतिनिधी ) : विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची निवड करण्यापूर्वी आधी आपले ध्येय निश्चित करावे असे मत भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी व्यक्त केले. ते व्हाईस ऑफ मिडीयाच्या स्थानिक शाखेतर्फे आयोजित तालुक्यातील पत्रकारांच्या दहावी , बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत पाल्यांच्या गौरव समारंभात बोलत होते.
पंचायत समिती सभागृहात झालेल्या या समारंभात व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके अध्यक्षस्थानी होते. तर भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजु फालक, वेलनेस फाऊंडेशनचे संचालक निलेश गोरे, शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड नितीन खरे, समुपदेशक आरती चौधरी, ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील, व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत जोशी, जिल्हा प्रवक्ते संजयसिंग चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वाघमोडे पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी शॉर्ट एनालिसिस च्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वातील सकारात्मक बाजू आपल्या व्यक्तिमत्वातील कमतरता तसेच उपलब्ध असलेल्या संधी यांचा अभ्यास करावा व त्यानुसार आपले ध्येय निश्चित करावे. सध्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. रोजनिशी लिहुन स्वतःचे आत्मपरीक्षण करावे म्हणजे आपला विकास योग्य दिशेने होत आहे का हे आपल्या लक्षात येते असे वाघमोडे म्हणाले. डॉ. पालक म्हणाले नवीन शैक्षणिक धोरणात अनेक बदल होत भावी जीवनात विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. आवडीचे अभ्यासक्रम कशा पद्धतीने शिकता येणार आहेत. निलेश गोरे म्हणाले कोणते कॉलेज निवडावे या पेक्षा तेथील नॉलेज नुसार कॉलेज निवडावे. कोणी सांगितले म्हणून कोणत्याही मार्गावर जाऊ नका , बुद्धी बरोबर शारीरिक विकास सुद्धा लक्ष द्या. स्वतः मध्ये कौशल्य विकसित करा तरच आधुनिक जगात तुमचा निभाव लागेल. शेखर पाटील म्हणाले शिकत असताना स्वतः ला अपडेट करत राहा पालकांनी अपेक्षांचे ओझे मुलांवर टाकु नये. आरती चौधरी, अॅड नितीन खरे यांचीही यावेळी भाषणे झाली. याप्रसंगी ग्रीष्मा चव्हाण, समीक्षा आराक , विजय वाघ , अक्षरा पाचपोळ , तेजस तायडे, वरद नेमाडे, तेजांश काळे, लावण्या शेलोडे, वैभवी कांबळे, तनिषा तायडे, रेणुका चौधरी, याज्ञेश लांजेवार या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. रोप व पुस्तक देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. व्हॉइस ऑफ मीडिया भुसावळ तालुकाध्यक्ष उज्वला बागुल यांनी प्रास्ताविक केले. राजश्री देशमुख यांनी सुत्रसंचलन तर सुनील आराक यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ पत्रकार दिपक चांदवाणी , व्हाईस ऑफ मिडीयाचे तालुका सचिव सुनील आराक, उपाध्यक्ष संतोष शेलोडे , कलीम पायलट , सतीश कांबळे , प्रेम परदेशी , नाना पाटील सर , कमलेश चौधरी , इकबाल खान , विनोद गोरधे , आकाश ढाके , अॅड जास्वंदी भंडारी यांनी परिश्रम घेतले.