जामनेर : राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्याविरोधात षड्डू ठोकत बंड केले होते त्यामुळे रावेर लोकसभेत बंडखोरी होण्याची भीती होती. राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांनी दिलेल्या शब्दानंतर चौधरींचे बंड शकले आहे. जामनेरच्या रविवारी झालेल्या मेळाव्यात त्यांनी श्रीराम पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार केला.

जीवाचे रान करणार मात्र श्रीराम पाटलांना निवडून आणणार
आपल्या आक्रमक शैलीत चौधरी म्हणाले की, मी चार फार्म घेवून आलो म्हणून विविध चर्चा झाल्या मात्र ते फार्म मी शरद पवार पक्षाच्या नावाने आणले आहेत. मी जीवनात कधीही पवार साहेबांच्या शब्दाबाहेर जाणार नाही याची खात्री देतो. साहेबांना अनेक लोक सोडून गेले आहेत शिवाय आमच्यासोबत अनेकांनी दगा केला मात्र त्याचे उत्तर आम्ही योग्य वेळ आल्यावर देवू.
चौधरी म्हणाले की, साहेबांनी आणखी दोन सभा साहेबांनी आम्हाला द्याव्यात. मनात खूप बॅगलॉक साचला आहे त्यामुळे आम्हाला भरपूर काही बोलायचे आहे..
भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर मतदारसंघात ताकद दाखवून देवू, श्रीराम पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून लढू, जीवाचे रान करू व 13 मे पर्यंत झोपणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला. श्रीराम पाटील यांच्या बाजूने जनता-जनार्दन आहे. आपल्याला सोडून गेलेल्यांना जनताच आता त्यांची जागा दाखवेल, असेही ते म्हणाले. निवडणुकीपर्यंत दबाव येईल, दादागिरी करण्याचे प्रयत्न होतील मात्र जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
माजी कृषी मंत्री शरद पवार, माजी मंत्री सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्या पाटील, अॅड.रोहिणी खडसे, संजय सावंत, ईश्वरलाल जैन, उमेदवार श्रीराम पाटील आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.


