भुसावळ : हतनूर धरणातून भुसावळ शहर, रेल्वे व दीपनगर औष्णिक केंद्राला दुसरे आवर्तन मिळाल्यानंतर धरणाचे पाणी शनिवारी रेल्वे व पालिका बंधार्यात पोहोचताच बंधारा ओव्हरफ्लो झाला. यामुळे आता भुसावळकरांची आगामी 40 दिवसांची तहान बंधार्यातील जलसाठ्यातून भागणार आहे. यासोबत कमी दाबाने पुरवठा, पिवळ्या रंगाचा पुरवठ्याचा प्रश्नही सुटेल.

40 दिवस तहान भागणार
भुसावळ शहराला तापीपात्रातील बंधार्यातून पाणीपुरवठा केला जातो. या बंधार्यात सुमारे 39 ते 42 दिवसांचा साठा करता येतो. गेल्या पंधरवड्यात बंधार्याची जलपातळी घसरली. यानंतर पालिकेने हतनूर प्रशासनाकडे आवर्तनाची मागणी केली होती. यानुसार हतनूर धरणातून 12 दलघमीचे आवर्तन एक हजार डे क्युसेस वेगाने सोडण्यात आले. हे आवर्तन पोहोचल्याने शनिवारी तापीपात्रातील अप्पर व निम्न बंधारा ओव्हरफ्लो झाला. शहरातील जलसाठ्याने तळ गाठल्यामुळे नागरिकांना गेल्या आठवड्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागला. काही दिवसांपासून अशुध्द व पिवळ्या रंगाचा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. आता बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने पिवळ्या रंगाचा, अशुध्द पाणीपुरवठ्यावरही नियंत्रण येणार आहे. शहरासाठी बंधार्यातील जलसाठा आगामी 40 दिवस पुरेल. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.


